मोदींनी धर्माच्या नावावर मते मागितली, निवडणूक लढवण्यावर बंदी घाला! दिल्ली उच्च न्यायालयात याचिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्माच्या आधारावर मते मागितली असल्याने त्यांच्यावर 6 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी मागणी करणारी एक याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे.

मोदींनी 9 एप्रिल रोजी पिलिभीतमध्ये प्रचार सभेत कथितपणे वारंवार धर्माचा उल्लेख करून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप याचिकाकर्ते अॅड. आनंद एस. जोंधळे यांनी केला आहे. हीच मागणी आपण निवडणूक आयोगाकडे केली होती, पण आपल्याला आयोगाने दाद दिली नाही, असे अॅड. जोंधळे यांनी याचिकेत म्हटले आहे.

पिलिभीतच्या सभेत कथितपणे देव आणि पूजेच्या स्थळांचा उल्लेख करत मते मागून मोदींनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असल्याचे याचिकेत म्हटले आहे. अॅड. जोंधळे यांच्या म्हणण्यानुसार, हिंदू देवदेवता आणि मंदिरे तसेच शिख देवता आणि प्रार्थनास्थळांच्या नावाने पंतप्रधान मोदी यांनी मतदारांना भाजपसाठी मतदान करण्याचे आवाहन केले. यामुळे कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी मोदींना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात यावे, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

आचारसंहिता काय सांगते…

विविध जाती किंवा धार्मिक वा भाषिक समुदायांमध्ये ज्यामुळे तेढ निर्माण होईल किंवा असलेले मतभेद वाढतील अथवा परस्पर द्वेष निर्माण होईल अशा कोणत्याही कृतीत कोणताही पक्ष किंवा उमेदवार सहभागी होणार नाही. मते मिळवण्यासाठी जात किंवा समाजाच्या भावनांना आवाहन करता कामा नये. मशीद, चर्च, मंदिरे किंवा इतर धार्मिक स्थळांचा वापर प्रचारासाठी मंच म्हणून केला जाणार नाही.

निवडणूक आयोगाची निष्क्रियता

भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अ (गटांमधील वैर वाढवणे) अंतर्गत पंतप्रधानांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी आणि मोदींना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यासाठी त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला होता. मात्र आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही, असे अॅड. जोंधळे यांनी याचिकेत म्हटले आहे.

मोदींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी आणि त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला. मात्र आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही, असे याचिकेत म्हटले आहे.

– पिलिभीतच्या सभेत मोदी म्हणाले की, त्यांनी राम मंदिर बांधले आहे. त्यांनी करतारपूर साहिब कॉरिडॉर विकसित केला आणि गुरुद्वारांमध्ये दिल्या जाणाऱया लंगरांमध्ये वापरल्या जाणाऱया साहित्यावरील जीएसटी काढून टाकला. अफगाणिस्तानातून गुरू ग्रंथसाहिबच्या प्रती परत आणल्या. या वक्तव्यांमुळे मोदींनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असा युक्तिवाद अॅड. जोंधळे यांनी केला आहे.

– पंतप्रधान मोदींनी केवळ हिंदू आणि शीख देवतांच्या आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागितली नाहीत तर विरोधी राजकीय पक्ष मुस्लीमधार्जिणे असल्याचीही शेरेबाजी केली. मोदींचे हे विधान द्वेष निर्माण करणारे आणि समाजातील दोन गटांमध्ये शत्रुत्वाची भावना, वैमनस्य निर्माण करते, असे याचिकेत म्हटले आहे.