Maratha Reservation Protest मुंबईतील आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंची याचिका, 22 जानेवारीला सुनावणी

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये मराठा समाज आंदोलन करणार आहे. 20 जानेवारी रोजी मराठा समाजाचा मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईत पोहोचून आंदोलन सुरू होईल असा अंदाज आहे. या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवर 22 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

मला शब्दात गुंतवण्याचा सरकारचा डाव

जरांगे हे आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार सगळे डाव टाकण्याच्या तयारीत असून मला शब्दात गुंतवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माझ्याकडे खात्रीलायक माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोर्चामध्ये काहींना घुसवून हिंसाचार, जाळपोळ घडवून आणण्याचेही प्रयत्न असून मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांनी सतर्क राहून हे प्रयत्न हाणून पाडावेत असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.

सोमवारी रात्री सरकारची या आंदोलनासंदर्भात एक बैठक झाली आणि यातील काही मंत्र्यांनी आंदोलनाला विरोध केल्याचे आपल्याला कळाल्याचे जरांगे यांनी म्हटले. मुंबईतील मोर्चा, आंदोलने याकडे साफ दुर्लक्ष करायचे अशी भूमिका या मंत्र्यांची असल्याची आपल्याकडे माहिती असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. मराठे का नकोयत, त्यांची शांततेत सुरू असलेली आंदोलने का नकोत? आम्हाला जेरीस आणण्याचा प्रयत्न करताय का ?असे सवाल जरांगेंनी विचारले आहेत.