20 साल बाद… आठवणींच्या गुगल सर्चमध्ये रमले सुंदर पिचाई

गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी कंपनीतील त्यांचा 20 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास पूर्ण केला आहे. पिचाई यांनी इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे या खासप्रसंगी आपला आनंद व्यक्त केला.

 सुंदर पिचाई यांनी म्हटलेय, ‘26 एप्रिल 2004 माझा गुगलमध्ये पहिला दिवस होता. तेव्हापासून बरेच काही बदलले आहे. तंत्रज्ञान, आमची उत्पादने वापरणाऱया लोकांची संख्या, माझे केस. काय बदलले नसेल तर या कंपनीसाठी काम करताना मला येणारी मजा. 20 वर्षांनंतरही मी स्वतःला भाग्यवान समजतो.’

सुंदर पिचाई यांनी आपल्या पोस्टमध्ये 20204 चा आयडी आणि 2024 चा आयडी शेअर केला आहे. त्यांच्या या पोस्टला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. नेटिजन्सनी त्यांचे भरभरून अभिनंदन केले आहे. 2004 साली सुंदर पिचाई यांनी प्रोडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली होती. 51 वर्षीय सुंदर पिचाई हे गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ आहेत.