रंगपट – रंगभूमी आणि माझ्यातली आई!

रंगदेवतेच्या साक्षीने घडलेला एक प्रसंग कथन करत आहे अभिनेत्री, नाटय़लेखिका दिग्दर्शिका पल्लवी वाघकेळकर

सन 2015 ची ही गोष्ट आहे. अबीर गुलाल या मिलिंद शिंदे लिखित आणि मंगेश सातपुते दिग्दर्शित नाटकात मी प्रमुख भूमिका रंगवत होते. एक उत्तम नाटक आणि महत्त्वाची भूमिका मिळाल्यामुळे माझा उत्साह वाढला होता. दिग्दर्शक मंगेश सातपुते, सगळे कलाकार आणि निर्माता अशोक शिगवण अशी खूप सुंदर टीम तयार झाली होती. शुभारंभानंतर पहिल्या पाच प्रयोगांतच नाटकाविषयी, माझ्या भूमिकेविषयी चांगली चर्चा सुरू झाली. स्वतःला नट म्हणून सिद्ध करणारे असे काम मिळाले की वाटते, बस, आता पुढची वाट सोपी होईल. पण आपण काहीही ठरवले तरी देवाच्या मनातला क्लायमॅक्स जास्त रंजक असतो.  

आमच्या नाटकाचे अवघे सहा प्रयोग झाले असतानाच मला माझा आनंद द्विगुणित करणारी गोड बातमी मिळाली. मी आई होणार होते. एकीकडे बऱयाच प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या गोड बातमीने घरात आनंदोत्सव सुरू झाला होता, पण निर्माते, दिग्दर्शक व मिलिंद दादा यांना मी हे कसे सांगू? असा प्रश्न मला पडला. निर्मात्याचे होणारे आर्थिक नुकसान व आमच्या टीमची जमलेली भट्टी या सगळय़ाचे काय होणार या विचारांनी मी हैराण झाले होते. मग एकदाचे मी ठरवले की, आता काही दिवस शांत राहायचे आणि प्रयोग करायचे, पण नाटकातले माझे प्रसंग माझ्या तब्येतीच्या दृष्टीने मला शांत राहू देणार नव्हते. नाटकातही प्रेग्नन्सी ड्रामा आणि काही स्टंट्स होते. मिलिंद दादा माझ्या पोटावर लाथ मारतो, नंतर बंदुकीने पोटावर नेम धरून गोळी झाडतो आणि माझे पात्र धारातीर्थी कोसळते, असे काही प्रसंग होते.पुढचे 25 प्रयोग करण्याचा मी निर्णय घेतला. ही रिस्क मी घेऊ शकले ते तीन गोष्टींच्या विश्वासावर!  मिलिंद शिंदे यांच्यासारखा कमालीचा नट जो अतिरंजित सीनही सहकलाकाराला कुठलाही त्रास न देता अत्यंत परिणामकारक करायचा. दुसरे असे की, प्रयोगाच्या दरम्यान माझा माझ्या बाळासोबत सुरू असलेला संवाद आणि तिसरे व सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे रंगभूमीवरची श्रद्धा आणि निष्ठा…!  पंधराव्या प्रयोगानंतर माझी गोड बातमी आमच्या टीमला देऊन 25 प्रयोग करण्याचे आश्वासन दिले आणि आमच्या संपूर्ण टीमनेही मला सहकार्य केले.  

पण पंचविसावा प्रयोग खासच ठरला. दामोदर हॉलमधला माझा तो शेवटचा प्रयोग होता. पहिल्याच सीनला एका विंगेतून एक्झिट घेऊन मी दुसऱया विंगेतून घरात एंट्री घेणार तोच विंगेत माझा पाय घसरला आणि मी पडले. तिथे उभे असलेले सहकलाकार आणि बॅकस्टेजची टीम क्षणभर स्तब्ध झाली. एकाने मला हात दिला आणि ‘‘नाटक थांबवू या का’’ असे त्याने म्हणायच्या आतच मी माझे स्वगत सुरू केले होते. शो मस्ट गो ऑन म्हणत प्रयोग तर पार पडला, पण मी खूप घाबरले होते.  

प्रयोग संपताच मी डॉक्टरकडे धाव घेतली पण देवाच्या कृपेने बाळ व्यवस्थित होते. या सगळय़ात नाटकाच्या संपूर्ण टीमचा मिळालेला सपोर्ट मी कधीही विसरू शकणार नाही, पण त्याहीपुढे जाऊन जे आतून जाणवले ते हे की, नाटकातल्या माझ्या भूमिकेची जबाबदारी मी घेतली होती. पण माझी आणि माझ्या बाळाची जबाबदारी त्या वेळी रंगदेवतेने घेतली होती. आता माझे बाळ तर छान मोठे होत आहे, पण त्यासोबतच गेली सात वर्षे लहान मुलांना रंगभूमीशी जोडण्याची सेवाही माझ्या हातून रंगभूमी करवून घेत आहे. रंगदेवतेशी जोडली गेलेली ही अदृश्य नाळ प्रत्येक कलाकाराला कायम अनेक जादुई चमत्कार दाखवत असते आणि म्हणूनच बहुधा प्रत्येक रंगकर्मीच्या मनात रंगभूमीचे स्थान हे अढळ श्रद्धेचे आणि निष्ठsचे राहिले आहे.  

शब्दांकन: राज चिंचणकर