शिंदे गटाकडून प्रत्येकी 6500 पानांचे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांना सादर

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू झाली असून शिंदे गटाच्या 39 आमदारांकडून प्रत्येकी 6500 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. देण्यात आले आहे. त्यामुळे मोठया संख्येने सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रांवर निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपविण्यात आला आहे. रिझनेबल टाईम म्हणजे ‘सुयोग्य वेळेत’ ही निर्णय प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीची प्रक्रीया सुरु केल्यावर शिंदे गटाकडून वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराकडून साडेसहा हजार पानांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. त्यात मूळ शिवसेना पक्ष हा आमचाच आहे आमच्या पक्षात फूट पडलेली नाही असा दावा केला आहे. त्यासोबत सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत व केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालपत्राची प्रतही प्रतिज्ञापत्रासोबत जोडली आहे.