कोटय़वधींचा खर्च, तरी रस्त्यांवर खड्डे; खड्डय़ांच्या दुरुस्तीवर दक्षता विभागाचा वॉच

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिका तब्बल 144 कोटींवर खर्च करीत असताना खड्डय़ांचे प्रमाण कमी होत नसल्याचे समोर आले आहे. मान्सून सक्रिय झाल्यापासून गेल्या दहा दिवसांत रस्त्यांवर 182 खड्डे पडल्याच्या तक्रारी मुंबईभरातून पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे खड्डय़ांची वाढती समस्या रोखण्यासाठी दक्षता विभागाकडून यावर ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. यामध्ये खड्डे दुरुस्तीचे काम निकृष्ट केल्याचे आढळल्यास कंत्राटदाराला दंड ठोठावण्यात येणार आहे. शिवाय काळय़ा यादीत टाकण्याची कारवाईदेखील होऊ शकते.

पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या दहा दिवसांत खड्डे पडल्याच्या 185 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांशी खड्डे भरण्यात आले असून 50 ठिकाणी काम बाकी असल्याची माहिती आहे. त्यामुळे पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनचालक, नागरिकांकडून करण्यात येत आहे, तर पालिकेनेही खड्डे दुरुस्तीचे काम दर्जेदार होण्यासाठी पंबर कसली आहे. यामध्ये निकृष्ट काम केल्यास रोख दंड, काळय़ा यादीत टाकणे आणि पालिका नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पालिका म्हणते…

रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ‘रिऑक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञानात केमिकल व डांबराचा वापर करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या टायरला रिऑक्टिव्ह अस्फाल्ट चिकटत नाही. तसेच खड्डा बुजवल्यानंतर पुढील 15 मिनिटांतच या रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येणार आहे. पाऊस सुरू असतानाही या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो.

तर ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रीट’ तंत्रज्ञानात खड्डा बुजवण्यासाठी सिमेंट, काँक्रीटसाठी लागणारे खडीसारखेच साहित्य आणि पॉलिमर वापरण्यात येते. मोठे खड्डे भरण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये अवघ्या सहा तासांत वाहतूक सुरू करता येते. खड्डे वर्षानुवर्षे मजबूत राहतात.