Lok Sabha Election 2024 : प्रचारादरम्यान मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडली; प्रकाश आंबेडकरांची टीका

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडले. महाराष्ट्रातील हा अखेरचा टप्पा होता आणि 4 जून रोजी निकाल लागणार आहे. फोडाफोडीचे राजकारण, पक्षातील फूट यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीचे रुपांतर ग्रामपंचायत निवडणुकीत केले आणि प्रचारादरम्यान मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडली असा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

लोकसभेच्या निवडणुकीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये केले. निवडणुकीचा प्रचार अत्यंत क्रूरपणे करण्यात आला. यादरम्यान वैयक्तिक हल्ले करण्यात आले आणि पंतप्रधान मोदींनी वापरलेली भाषा अत्यंत हिन दर्जाची होती. मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली नाही. केंद्रीय तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनल्याचेही या निवडणुकीतून स्पष्ट झाल्याचे आंबेडकर म्हणाले. ‘जनसत्ता‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

प्रत्येक निवडणुकीमध्ये पंतप्रधान पक्षाचा प्रचार करतात. काही सभा घेतात. पण पंतप्रधान मोदींनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचार केला आणि विधानसभा, महानगरपालिका निवडणुकीचाही प्रचार केला. प्रत्येक निवडणूक त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसारखी लढली, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच यंदा लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांनी चांगली लढत दिल्याने भाजपच्या जागा घटतील. त्यामुळे भाजपच्या 400 पारच्या मिशनलाही धक्का बसेल, असा ठाम विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, दलितांमध्ये भाजपविरोधात नाराजी असून त्यांनी एकजुटीने मतदान केले आहे. याचा प्रभाव महाराष्ट्र आणि देशातील अन्य राज्यातही दिसेल. दलित समाजाची लोकं पुन्हा भाजपचे समर्थन करताना दिसणार नाहीत. आरएसएस आणि हिंदुराष्ट्रासंबंधात त्यांच्या मनात संभ्रम कायम आहे. विकासाच्या मुद्द्यांवरही मोदींनी निराश केल्याचेही आंबेडकर म्हणाले.

भाजपकडून धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही बेरोजगारी, महागाई हा मुद्दा प्रकार्शाने जाणवला. लोकांनी निवडणूक रोखे, महागाई, बेरोजगारीवरून सत्ताधाऱ्यांनी घेरल्याचे दिसले, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. मंगळसुत्र, मुसलमानांना संपत्तीचे वाटप हे मुद्दे प्रचारात आणून मोदींनी लक्ष्मण रेषा ओलांडल्याची टीकाही त्यांनी केली.