ईडी, सीबीआयचा ससेमिरा संपवण्यासाठी भाजपचे सरकार घालवावेच लागेल; पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

prithviraj-chavan

आगामी लोकसभा आणि पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स या यंत्रणांचा विरोधकांविरोधात होणारा गैरवापर या मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसनेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवायचे असेल, तर भाजपचे सरकार घालवले पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत भाजपचा पराभव झाला, तर विधानसभेत आपल्यासमोर आव्हान राहणार नाही, असे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत ते म्हणाले की, इंडिया आघाडीच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह काही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहोत. भाजपच्या विरोधात एकास-एक उमेदवार उभे करू. महाराष्ट्रात तिन्ही पक्ष जागावाटपासाठी एकत्र बसू. त्यामुळे जागावाटपाबाबत कोणताही वाद होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपापल्या पक्षांची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. त्यामुळे काही मतभेद होण्याची शक्यता आहे. मात्र, दडपशाही करणाऱ्या भाजपचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीत सर्व एकत्र आले आहेत. हे महत्त्वाचे आहे. ईडीच्या केसेस, सीबीआयचा ससेमिरा किंवा अन्यायकारण निधीवाटप संपवण्यासाठी भाजपचे सरकार घालवलं पाहिजे. त्याची सुरूवात लोकसभेपासून होईल. लोकसभेत पराभव झाला, तर विधानसभेत आव्हान राहणार नाही, असेही चव्हाण म्हणाले.

लोकसभेत आपल्याला पराभव स्विकारावा लागला, तर मग विधानसभा निवडणूक होणार नाही. कारण, त्यानंतर देशात लोकशाही राहील की नाही, अशी परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले. मी पळालो नाही, तर मला पळवलं गेले, असे विधान ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी ललिल पाटीलने म्हटले आहे. यावर चव्हाण म्हणाले की, तेलगी प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांची नावे आली. नंतर ते प्रकरण दडपण्यात आले. तसेच, सत्तेतील सरकार हे प्रकरण दडपून टाकतील. त्यात काही मंत्र्यांचा संबंध असल्याचे बोलले जात आहे. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.