विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे; पृथ्वीराज चव्हाण यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर

देशातील 26 विरोधी पक्षांनी एकत्र येत आपल्या महाआघाडीला बेंगळूरूमध्ये झालेल्या बैठकीत इंडियन नॅशनल डेव्हल्पमेंटल इनक्लुजिव्ह अलायन्स म्हणजेच ‘इंडिया’ असे नाव दिले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली. तसेच ईस्ट इंडिया कंपनीपासून दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीन यांच्या नावाचा उल्लेख करत ‘इंडिया’ नावावर टीका केली. याला आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं. ते बुधवारी मुंबईत विधीमंडळाबाहेर बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया नावावर चर्चा करणं हास्यास्पद आहे. ही विचारांची लढाई आहे आणि आम्हाला मोदींचा विचार घालवायचा आहे. आयआयटी, आयआयएम, एम्सच्या नावात इंडिया आहे. ही नावं मोदी बदलणार आहेत का? विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. मणिपूरवर बोलायची पंतप्रधान मोदींची हिंमत नाही. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी ते अशी टीका करतात, असे चव्हाण म्हणाले.

पंतप्रधान मणिबाबत बालोत नाही. मात्र, नावाबद्दल, फोटोबद्दल, चित्राबद्दल बोलत आहेत. हे अतिशय बालिशपणाचे आहे. आम्ही इंडिया आहोत आणि आम्हाला इंडिया असल्याचा, भारत असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे मोदींनी नावावरून काहीही कुरापत काढली, तरी त्याचा उपयोग होणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

भाजपेतर विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ नावाच्या महाआघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी टीका केली होती. ब्रिटिशांची राजवट लादणारी ‘ईस्ट इंडिया कंपनी’, दहशतवादी संघटना ‘इंडियन मुजाहिद्दीन’, बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, अगदी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ या नावांमध्ये ‘इंडिया’ शब्द वापरला आहे. केवळ नाव घेऊन यश मिळत नसते, अशा शब्दांत मोदी यांनी टीका केली होती. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.