संभाजी भिडे यांच्या विधानाचा निषेध करणाऱ्या 3 आमदारांना धमक्या

संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानांचा निषेध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या 3 आमदारांना धमक्या मिळाल्या आहेत. हा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी तर त्यांना ट्विटरवर मिळालेल्या धमकीच्या प्रिंटआऊटचा कागदच फाडकावला. आपल्याला धमकी देणाऱ्याने आपण धारकरी असून कोथळे काढतो, दाभोळकरांना जन्नतमध्ये पाठवलं असं म्हटल्याचं ठाकूर यांनी म्हटले. यशोमती ठाकूर यांच्यापाठोपाठ काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्याला धमकी आल्याचे म्हणत संभाजी भिडे हा माणूस फ्रॉड असल्याचे म्हटले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की मला धमकीचे फोन, ईमेल आले आहेत. माझ्याप्रमाणेच यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही धमकी मिळाली होती. या धमक्यांमागचा सूत्रधार कोण आहे हे शोधून काढण्याची गरज आहे असे चव्हाण यांनी म्हटले. यशोमती ठाकूर यांनी म्हटले की, मी महिला आमदार आहे, भिडे गुरुजींच्या विधानांचा मी विरोध केला होता. त्यानंतर मला ट्विटरवर धमकी आली आहे. “दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस जन्नतमध्ये पाठवला. आम्ही धारकरी कोथळे बाहेर काढतो लक्षात असू द्या” कैलास सुर्यवंशी याने ट्विटमध्ये ही धमकी दिली आहे. माझ्या जीवाला काही झालं तर कोण जबाबदार आहे? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी विचारला.

आम्हाला ते गुरुजी वाटतात, तुम्हाला काय अडचण आहे ?

आमदारांनी उपस्थित केलेल्या या मुद्दावर निवेदन करताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, संभाजी भिडे गुरुजी यांना अमरावती पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून ती त्यांनी स्वीकारली आहे. अमरावतीमधील सभेचे व्हिडीओ उपलब्ध नाहीत. माध्यमांमध्ये फिरणारे व्हिडियो हे निरनिराळ्या ठिकाणचे व्हिडीओ आहे. अमरावती पोलिसांनी भिडे यांचे व्हॉईस सँपल घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. ठाण्यातही तक्रार दाखल केली असून ती अमरावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. विरोधकांनी फडणवीस हे संभाजी भिडे यांचा उल्लेख भिडे गुरुजी असा करत असल्याबद्दल आक्षेप घेतला असता ते म्हणाले की ते आम्हाला, “गुरुजी वाटतात, काय अडचण आहे. त्यांचे नाव भिडे गुरुजी आहे.”

फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही जर अवमानजनक वक्तव्य केलं तर त्यांच्याविरोधात केस दाखल होईल आणि पोलीस कारवाई होईल. भिडे गुरुजी हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ल्यांशी बहुजनांना जोडण्याचे काम करतात. हे काम चांगले असले तरी त्यांना महापुरुषांविरोधात असे वक्तव्य करण्याचा कोणीही अधिकार दिलेला नाही.