‘सामना’च्या बातमीनंतर ठाणे पोलीस जागे झाले; फरार अश्वजीत गायकवाडला अटक, साथीदारांनाही बेड्या

प्रेयसीला गाडीखाली चिरडून फरार झालेला एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र अश्वजीत गायकवाडला आज रात्री उशिरा अखेर पोलिसांनी अटक केली. त्याचे दोन साथीदार रोमिल पाटील व सागर शेळके यांनाही बेडय़ा ठोकल्या असून स्कॉर्पिओ व लँड रोव्हर डिफेंडर या दोन आलिशान गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. दैनिक ‘सामना’च्या बातमीनंतर ठाणे पोलिसांना खडबडून जाग आली असून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले आहेत.

घोडबंदर येथे राहणारी प्रिया सिंग हिला सोमवार 11 डिसेंबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास प्रियकर अश्वजीत याने ओवळा येथील हॉटेल कोर्टयार्ड येथे भेटायला बोलावले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अश्वजीतने प्रियाला शिवीगाळ करून प्रचंड मारहाण केली. तिच्या हाताचाही चावा घेतला. एवढेच नव्हे, तर मित्र रोमिल पाटील व सागर शेळके यांना तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडण्यास सांगितले. या दोघांनी अश्वजीतच्या सांगण्यानुसार प्रियाला गाडीखाली चिरडले. या भीषण घटनेत ती गंभीर जखमी झाली असून तिला ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर अश्वजीतसह तिघेही फरार झाले होते; मात्र आज रात्री त्यांना ठाण्यातूनच ताब्यात घेतले.

 चित्रपटातील दृश्यालाही लाजवेल अशी भयंकर घटना घडल्यानंतर दैनिक ‘सामना’ने याबाबतचे वृत्त सर्वप्रथम  प्रसिद्ध करून या घटनेला वाचा फोडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ही घटना घडून आठवडा उलटला तरी पोलिसांनी कोणतीही हालचाल न केल्याने हल्लेखोर मोकाट होते. प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर ठाणे पोलीस जागे झाले आणि आज रात्री अश्वजीतसह त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली. उद्या तिन्ही आरोपींना दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच आज ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी डीसीपी झोन 5चे उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.

…तर आणखी कलमे लावू

प्रेयसीला आपल्या गाडीखाली चिरडल्याची घटना घडल्यानंतर अश्वजीत गायकवाडसह त्याच्या दोन साथीदारांवर सध्या 279, 338, 323, 504 व 34 ही कलमे लावली आहेत. तपासादरम्यान आणखी पुरावे व माहिती मिळाल्यास त्यानुसार अन्य कलमेही लावण्यात येतील, असे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले.

महिला आयोगाने मागवला अहवाल

या हल्ल्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्याकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.

सीसीटीव्ही फुटेज गायब

ओवळय़ातील ज्या कोर्टयार्ड हॉटेलजवळ हल्ल्याची भीषण घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज हा तपासामध्ये महत्त्वाचा दुवा ठरणार होता. मात्र हे फुटेजच अचानक गायब झाले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे फुटेज कुणी व का गायब केले, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे.

माझ्याकडून कोऱया कागदावर सही घेणार होते

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी माझ्याकडून कोऱया कागदावर सही घेण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र मी त्यास साफ नकार दिला. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील हे तावातावाने हॉस्पिटलमधून निघून गेले, असा आरोप प्रिया सिंग हिने केला आहे. तसेच महिला पोलीस आपल्याला सहकार्य करीत नसल्याची तक्रारही तिने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे केली.

मॅडम, केस करून उपयोग नाही!

खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या प्रिया सिंग हिने पोलिसांना दिलेल्या जबानीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ज्या गाडीखाली तिला चिरडले त्याचा चालक सागर शेळके याने प्रियाला दमदाटी केली. मॅडम, तुम्ही केस वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण त्याचा काही उपयोग होणार नाही. ते मोठे लोक आहेत. तुम्ही समझोता करून घ्या. तुमच्या उपचाराचा खर्च ते देतील अशी भीती त्याने दाखवली; मात्र सागरच्या या धमक्यांना भीक न घालता प्रिया हिने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.

ठाणे पोलीस कोणाची वकिली करीत आहेत?

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी दुपारी पीडिता प्रिया सिंग हिची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली व तू घाबरू नकोस. शिवसेना तुझ्या पाठीशी आहे, असा धीर दिला. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एका तरुणीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न होतो याचा अर्थ काय? ही घटना घडून आठवडा उलटला तरी आरोपी मोकाट आहेत. ठाण्याचे पोलीस नेमकी कोणाची वकिली करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर रात्री उशिरा आरोपींना अटक झाली.