पंतप्रधान मोदींनी अदानींचे हजारो कोटींचे कर्ज माफ केले, प्रियांका गांधी यांचा गंभीर आरोप

केंद्रातील भाजपचे सरकार हे बिल्डर धार्जिणे आहे. या सरकारला गरीबांचे काहीही देणेघेणे नाही. देशात पैसा नाही, अशी बोंब मारणाऱया मोदी सरकारने उद्योगपती गौतम अदानी यांचे हजारो कोटी रुपये माफ केले आहेत, असा गंभीर आरोप करीत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी शनिवारी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दमोहमध्ये आयोजित रॅलीत बोलताना प्रियांका यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला. मध्य प्रदेशातील सध्याच्या सरकारला लवकरच निरोप मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांत फक्त 21 रोजगार दिले गेले. देशात पैशांची कमतरता आहे असे म्हणतात, तर मग अदानींसारख्या उद्योगपती यांचे हजारो कोटी रुपये कसे काय माफ केले? असा सवालही प्रियांका गांधी यांनी या वेळी विचारला. उत्तर प्रदेशात रोजगाराच्या नावाने फक्त घोटाळा केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. देशात जातनिहाय जनगणना होणे खूप आवश्यक आहे. याचे समर्थन काँग्रेसने आधीच केले आहे. बिहारमध्ये जातनिहाय जनगणना केल्यामुळे 84 टक्के जनता ही एससी, एसी आणि ओबीसी आहे, हे उघडकीस आले आहे. मोठमोठय़ा नोकऱयांमध्ये या समाजाचे प्रतिनिधित्व खूपच कमी आहे, असेही प्रियांका म्हणाल्या.