इस्त्रोची भरारी! XPoSat उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, ब्लॅक होल्स आणि आकाशगंगेचे रहस्य उलगडणार

गतवर्षी ‘चांद्रयान-3’ आणि ‘आदित्य एल-1’ या मोहिमा यशस्वी झाल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गगन भरारी घेतली आहे. इस्त्रोने सोमवारी सकाळी क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाचे (XPoSat) यशस्वी प्रक्षेपण करत इतिहास रचला आहे. पृथ्वीपासून 650 किलोमीटर अंतरावर हा उपग्रह स्थापित केला जाईल.

इस्त्रोने सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रहाचे (XPoSat) PSLV-C58 रॉकेटच्या सहाय्याने यशस्वीपणे प्रक्षेपण केले. या उपग्रहाद्वारे जो पल्सर, ब्लॅक होल्स, आकाशगंगा आणि रेडिएशनचा अभ्यास केला जाणार आहे. असा उपग्रह अवकाशात सोडणारा हिंदुस्थान अमेरिकेनंतर दुसराच देश आहे.

क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह (XPoSat) अंतराळात होणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करणार आहे. यासह त्यांच्या स्त्रोतांचा फोटो घेईल. या उपग्रहामध्ये बसवण्यात आलेली दुर्बिण रमन रिसर्च इन्स्टिट्यूटने बनवलेली असून हा उपग्रह विश्वातील 50 तेजस्वी स्त्रोतांचा अभ्यास करणार आहे. उदा. पल्सर, ब्लॅक होल, एक्स-करे बायनरी, एक्टिव्ह सक्रिय गॅलेक्टिक न्यूक्ली, नॉन-थर्मल सुपरनोव्हा.

इस्त्रोने सन 2017मध्ये  या अभियानाची सुरुवात केली होती. या मोहिमेचा खर्च 9.50 कोटी रुपये असून प्रक्षेपणानंतर 22 मिनिटांनी हा उपग्रह कक्षेत स्थापित करण्यात आला. हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याचे इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितले.

दरम्यान, पुढील वर्षभरात आम्ही 12 मोहिमा करणार आहोत. 2024 हे वर्ष गगनयान तयारीसाठीही महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच जीएसएलव्हीचेही प्रक्षेपण करणार आहोत, अशी माहितीही एस. सोमनाथ यांनी दिली.