पुणे – मद्यधुंद बस चालकाने गाडी उलटी चालवली, दहा ते बारा गाड्यांना उडवले

रस्त्यावर एका कारचालकासोबत झालेल्या वादामुळे चिडलेल्या पीएमपीएल बस चालकाने बेदरकारपणाने रिव्हर्स बस चालवीत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर प्रवाशांनी हृदयाचा ठोका चुकविणारा हा थरार अनुभवला. यावेळी बसमध्ये चालकाचा एकूणच रुद्रावतार पाहून घाबरून मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली. प्रवाशांनी वारंवार विनंती करून देखील या चालकांनी बस थांबविली नाही. चालकाविरोधात चतुशृंगी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजते.

निलेश ज्ञानेश्वर सावंत (वय 31, रा. अतुल नगर, वारजे माळवाडी) असे चालकाचे नाव आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सुशील सुभाष लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलजवळ असलेल्या सिम्बॉयसिस कॉलेज ते पुणे विद्यापीठ चौकादरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावंत हा पीएमपीएमएल बस चालक आहे. तो शनिवारी पीएमपीएमएलची बस पुणे विद्यापीठाच्या दिशेने जात होता. त्यावेळी या बसने एका कारचालकाची कार दाबली असा समज झाल्याने कारचालकाने त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर चिडलेल्या चालकाने बस उलट दिशेने चालवीत गाड्यांना उडविले. या घटनेमुळे पुणेकरांना काही वर्षांपूर्वी घडलेल्या संतोष माने प्रकरणाची आठवण झाली आणि अंगावर शहरा आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.