पुणे – सराईत जंगल्या सातपुतेच्या साथीदाराला अटक

पुणे शहरात दहशत माजविणार्‍या सराईत विशाल उर्फ जंगल्या सातपुते टोळीतील सक्रिय गुन्हेगाराला घरफोडीप्रकरणात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक धारदार शस्त्रास्त्रे बाळगणे, आर्म अ‍ॅक्टप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अजिंक्य सुरेश शिंदे (वय 24 , रा. लोहिया नगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संबंधिताला लष्कर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सराईत विशाल उर्फ जंगल्या सातपुते टोळीतील पसार आणि घरफोडीतील गुन्हेगार लोहियानगर परिसरात असल्याची माहिती पोलीस अंमलदार महेश पाटील आणि अमलदार सुमित ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देउन अजिंक्यला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, एसीपी सुनील तांबे, एसीपी सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर पोलीस नाईक ढगे सुमीत ताकपेरे, महेश पाटील यांनी केली.