गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गुंडांची झाडाझडती, अडीच हजार गुन्हेगार तपासले

गणेशोत्सव, तसेच ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री शहरातील गुंडाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करून गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. यामध्ये तब्बल 2 हजार 544 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून 757 गुन्हेगार मिळून आले आहेत.

उत्सवाच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणार्‍या सराईतांविरुद्ध कारवाई करण्यासाठी रविवारी मध्यरात्री विशेष मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन)राबवून गुंडांची तपासणी करण्यात आली. स्थानिक पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा, तसेच विविध पोलीस ठाण्यातील पथके या मोहिमेत सहभागी झाले होते. गुन्हेगार राहत असलेल्या भागाची पाहणी करण्यात आली. परिमंडळ एकच्या हद्दीत पोलिसांनी कोयता बाळगणार्‍या गुंडाला अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. गावठी दारुची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करुन एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ दोनच्या हद्दीत गंभीर गु्न्ह्यात फरारी असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले. बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली. परिमंडळ तीन, चार आणि परिमंडळ पाचमधील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली.

अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी अक्षय सुरेश शिंदे (वय 22, रा. मयूरी कॉलनी, हांडेवाडी रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक किलो गांजा, मोबाइल, दुचाकी जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने पर्वती भागात गंभीर गुन्ह्यातील आरोपी आदित्य युवराज भालेराव (वय 19), ऋतिक दिलीप कांबळे (वय 23), गौरव वामन चव्हाण (वय 23), अजय राजू दास (वय 19, रा. महात्मा फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांना अटक केली. पोलिसांनी रेल्वे स्थानक, एसटी स्थानक परिसर, तसेच शहरातील लॉज, हॉटेलची तपासणी केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

वाहतूक नियमभंगप्रकरणी पाचशे जणांवर कारवाई
नाकाबंदीमध्ये पोलीस ठाण्यांकडून 965 संशयित वाहनचालकांना चेक करून यातील नियमभंग करणार्‍या 257 जणांवर 2 लाख 24 हजा रुपयांची दंडात्मक कारवाई केली. तर, वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करुन 261 जणांवर कारवाई करून 2 लाख 25 हजार रुपये दंड वसूल केला.