जगाच्या पाठीवर -जगातील पहिले विद्यापीठ

>>राधिका मोरे

शाळा चालू झाली की वहय़ा, पुस्तके, पाण्याची बाटली, दफ्तरे घ्यायला गर्दी होते. हे शिक्षण विद्यापीठांपर्यंत जाते. जगात अशी अनेक विद्यापीठे आहेत. आपल्या भारतात नालंदा, तक्षशिला ही जगप्रसिद्ध विद्यापीठे होती. जगभरातून ज्ञानाची लालसा असणारे विद्यार्थी तिथे शिकायला येत.

सध्या अस्तित्वात असलेल्या विद्यापीठांमध्ये बोलोग्ना हे विद्यापीठ सगळय़ात जुने समजले जाते. हे विद्यापीठ इटली या देशात आहे. हे विद्यापीठ 1088 साली स्थापन झाले. तेव्हापासून आजतागायत ते चालू आहे. त्या विद्यापीठात सुमारे अठ्ठय़ाऐंशी विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी सुमारे 6500 विद्यार्थी इतर देशांतील आहेत.

या विद्यापीठांतून ख्रिश्चन धर्माचे तीन पोप-धर्मगुरू शिकले. इटलीतील अनेक उद्योगपती, नेते या विद्यापीठांतून शिक्षण घेऊन जगभर प्रसिद्ध झाले.

त्यानंतर इंग्लंडमध्ये 1096 साली ऑक्सफर्ड विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठांतून इंग्लंडच्या 28 पंतप्रधानांनी, 50 नोबेल पुरस्कार विजेत्यांनी शिक्षण घेतले. सर स्टिफन हॉकिंग हे त्यापैकी एक विद्यार्थी. सुमारे 24,300 विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेतात.

स्पेनमध्ये 1134 मध्ये स्थापन झालेले सलामान्का विद्यापीठ हेही जुने विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ स्पेन या देशात माद्रीद शहराच्या पश्चिमेस आहे. अमेरिकेचा शोध लावणारा ख्रिस्तोफर कोलंबस याने याच शहरापासून आपल्या मोहिमेस सुरूवात केली. सुमारे 27 हजार विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेतात. पारिसमधील, फ्रान्स देशातील 1160 मध्ये स्थापन झालेले पारिस विद्यापीठही फार जुने आहे.

इंग्लंडमध्ये1209 मध्ये केंब्रिज विद्यापीठ स्थापन झाले. या विद्यापीठात सुमारे 24 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी सुमारे 5500 विद्यार्थी इतर देशांतील आहेत.