तुमच्यासाठी शूर मुलींपेक्षा बाहुबली मोठे आहेत का? विनेश फोगाट प्रकरणी राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देशातील प्रत्येक कन्येसाठी कुठल्याही पदकापेक्षा आत्मसन्मान सर्वाधिक महत्त्वाचा आहे. अशा वेळी बाहुबली असण्याची टिमकी मिरवणाऱया व्यक्तीकडून मिळणाऱया राजकीय फायद्यांचे मोल तुम्हाला या शूर मुलींच्या अश्रूंपेक्षा अधिक वाटते आहे का? तुम्ही देशाचे पालक आहात. तुमचा असा निष्ठtरपणा मनाला यातना देतो, असा हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी विनेश फोगाट प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला.

कुस्तीपटूंचे आंदोलन आणि पुरस्कार परत करण्यावरून राहुल गांधी यांनी आज थेट मोदींना टीकेचे लक्ष्य केले. या शूर मुलींच्या अश्रूंपेक्षा तुम्हाला राजकीय फायद्यांचे मोल जास्त आहे का, तुमची निष्ठुरता मनाला यातना देते… अशी एक पोस्ट एक्सवर लिहून त्यांनी विनेशला पाठिंबा दर्शवला आहे.

राहुल गांधी यांचा प्रश्न
विनेशला पाठिंबा देण्यापूर्वी राहुल गांधींनी बजरंग पुनियाचेही समर्थन केले होते. एक्सवर त्यांनी, या खेळाडूंना, भारताच्या मुलींना जर आपल्या आखाडय़ातील लढा सोडून आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी रस्त्यावर उतरावे लागले तर आपल्या मुलांना हा मार्ग निवडण्यासाठी कोण प्रोत्साहन देईल, असा प्रश्न उपस्थित केला होता.