‘नंबर वन’च्या स्थानासाठी रस्सीखेच; राजस्थान-कोलकाता आज ईडन गार्डन्सवर भिडणार

आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात धमाकेदार कामगिरी करणारे राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आता कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भिडणार असून, त्यांच्यात ‘नंबर वन’च्या स्थानासाठी रस्सीखेच रंगणार आहे. राजस्थान अन् कोलकाता दोन्ही संघ सुपर फॉर्ममध्ये असल्याने क्रिकेटप्रेमींना एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार एवढे नक्की!

तोडीस तोड गोलंदाजी
राजस्थान व कोलकाता या संघांकडे तोडीस तोड असा गोलंदाजी ताफा आहे. राजस्थानच्या दिमतीला ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल व केशव महाराज अशी गोलंदाजीची प्रतिभावान चौकडी आहे. युझवेंद्र चहलकडे पर्पल कॅप असून, कोलकात्याच्या फलंदाजीला सुरुंग लावण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. ट्रेंट बोल्टपासून यजमान संघाला सावध राहावे लागणार आहे. दुसरीकडे कोलकात्याकडेही मिचेल स्टार्क, सुनील नारायण, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे. सुनील नरिनने ईडन गार्डनवर नेहमीच प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचविलेले आहे. राजस्थानच्या फलंदाजांना सर्वाधिक धोका असेल तो या विंडीजच्या फिरकी गोलंदाजाचा.

राजस्थानची भिस्त फलंदाजीवर
उभय संघांमध्ये अनेक मॅचविनर फलंदाज आहेत. त्यामुळे विजयाच्या शर्यतीत दोन्ही संघांची भिस्त ही खऱया अर्थाने आपापल्या फलंदाजीवर असेल. राजस्थानकडे यशस्वी जैस्वाल, कर्णधार संजू सॅमसन, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल व केशव महाराज अशी खोलवर फलंदाजी आहे. जोस बटलर परतल्यास या संघाची फलंदाजी आणखी मजबूत होईल. जैस्वाल अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करत नाही, ही या संघाची मुख्य चिंता होय. मात्र, मधल्या फळीने या संघाला सातत्याने तारले आहे. फलंदाजीने दगा दिल्यास ही उणीव त्यांचे गोलंदाज भरून काढतात. त्यामुळे सांघिक कामगिरीवर विश्वास असलेल्या या संघाला रोखण्यासाठी कोलकात्यालाही सर्वच आघाडय़ांवर सरस खेळ करावा लागणार आहे.

कोलकात्याकडे तुफानी फलंदाज
फिल सॉल्ट आणि सुनील नारायण ही सलामीची जोडी पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांना पळता भुई थोडी करतात. आंद्रे रसेल व रिंकू सिंग यांच्याकडे फिनिशरची भूमिका असते. कोलकात्याच्या या चारही फलंदाजांमध्ये आपल्या संघाला एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. फक्त कर्णधार श्रेयस अय्यर अद्यापि फॉर्ममध्ये नाहीये ही एकच समस्या या संघाकडे आहे. लखनौविरुद्ध 162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रेयसने 38 चेंडूंत नाबाद 38 धावांची खेळी केली होती. मात्र, वेगवान आणि फिरकी गोलंदाजीपुढे तो मनमोकळा खेळताना दिसला नाही. राजस्थानची गोलंदाजीही तगडी आहे. त्यामुळे श्रेयसला आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून फलंदाजीत योगदान द्यावे लागणार आहे.