रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय सलाईनवरून व्हेंटिलेटरकडे, आता खासगी डॉक्टर येणेही बंद

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाची अवस्था अधिकच धोकादायक बनली आहे. यापूर्वी सलाईनवर असलेले जिल्हा रुग्णालय आता डॉक्टरांअभावी व्हेंटिलेटरवर जाणार आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. यापुर्वी जिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे खासगी डॉक्टरांना पाचारण केले जात असे. मात्र आता जिल्हा शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात गेल्यामुळे 1 एप्रिलपासून बाहेरील खासगी डॉक्टरांना बोलावणे बंद झाले आहे. त्यामुळे रुग्णांची परवड होणार आहे. हॉस्पिटल आहे पण डॉक्टर नाही अशी अवस्था झाली आहे.

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये गेली अनेक वर्षे फिजीशियन उपलब्ध नाहीत. 31 मार्चपर्यंत पॅनलवरच्या खासगी डॉक्टरांना बोलावून रुग्णांवर उपचार केले जात होते. राष्ट्रीय आरोग्य अभियानातून खासगी डॉक्टरांचे एक पॅनल तयार करण्यात आले होते. पॅनलवरचे डॉक्टर जसे उपलब्ध होतील, तसे त्या डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयात पाचारण केले जात होते. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये भूलतज्ज्ञही उपलब्ध नाहीत.

दोन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर असले तरी एका डॉक्टरची बदली झालेली आहे. लहान मुलांचेही डॉक्टर उपलब्ध नसून सध्या मानधनावरील डॉक्टर लहान मुलांवर उपचार करत आहेत. हाडांचे डॉक्टर उपलब्ध नसून मानधनावरील डॉक्टर येऊन सेवा बजावत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात यापूर्वी एनआरएचएममधून खासगी डॉक्टरांच्या पॅनलवरील डॉक्टरांना बोलावून रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यांचे मानधन एनआरएचएममधून दिले जायचे. परंतु जिल्हा शासकीय रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ताब्यात गेल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एनआरएचएममधून खासगी डॉक्टरांना बोलावू शकत नाही. त्यामुळे 1 एप्रिलपासून खासगी डॉक्टर जिल्हा रुग्णालयात येऊन सेवा देण्याचे बंद झाले आहेत. त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची चिंता वाढली आहे. आता डॉक्टर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आहे. ते आता कुठून डॉक्टर उपलब्ध करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दापोलीतून भूलतज्ज्ञ बोलवावा लागला
जिल्हा शासकीय रुग्णालयात भूलतज्ज्ञ नाही. भूलतज्ज्ञ नसल्यामुळे अनेक शस्त्रक्रिया रखडल्या जातात. खासगी भूलतज्ज्ञांना बोलावू शकत नसल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाला त्यांच्या ग्रामीण रुग्णालयातून भूलतज्ज्ञ आणावे लागतात. सध्या दापोली, चिपळूण आणि राजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात भूलतज्ज्ञ उपलब्ध आहेत. काही दिवसांपूर्वी एका शस्त्रक्रियेसाठी दापोलीहून भूलतज्ज्ञ बोलवावा लागला.