कलम 370, चीनलगतच्या सीमारेषेचा संदर्भ बदलला; एनसीईआरटीच्या बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात मोठे बदल

एनसीईआरटीने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पाठय़पुस्तकात मोठे बदल केले आहेत. चीनलगतची सीमारेषा, कलम 370 बाबतचा संदर्भ बदलण्यात आला आहे. याशिवाय पीओके, अयोध्या, बाबरी मशीद विषयांशी निगडितही बदल करण्यात आले आहेत.

आगामी शैक्षणिक वर्षासाठी एनसीईआरटीच्या बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून चीनसोबतच्या हिंदुस्थानच्या सीमा परिस्थितीचा संदर्भ बदलण्यात आला आहे. कॉन्टेम्परेरी वर्ल्ड पॉलिटिक्स या पुस्तकातील पाठ 2 मध्ये हिंदुस्थान-चीन संबंध या शीर्षकाखाली माहिती आहे. त्यात आता बदल केला आहे. पुस्तकातील पान क्रमांक 25 वर, ‘तथापि, दोन देशांमधील सीमा विवादावर झालेल्या लष्करी संघर्षाने त्या आशा धुळीस मिळवल्या’ असे लिहिले होते. जे बदलून ‘हिंदुस्थानी सीमेवर चीनच्या आक्रमकतेने ती आशा धुळीस मिळवली आहे,’ असे म्हटले आहे. यावर स्पष्टीकरण देताना एनसीआरटीने सांगितले की, ‘प्रकरणाच्या संदर्भाशी जुळणारे वाक्य बदलले आहे.’

पुस्तकातील आधीचा परिच्छेद 1950 मधील

परिच्छेदात नमूद केलेला संदर्भ पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असतानाच्या काळातील आहे. या काळात ‘हिंदी-चिनी भाई भाई’ ही घोषणा लोकप्रिय झाली होती. पुस्तकातील परिच्छेद 1950 मध्ये चीनच्या तिबेटवरील ताबा आणि चीन-हिंदुस्थान सीमेवरील अंतिम करार, अरुणाचल प्रदेश व लडाखमधील अक्साई चीन प्रदेशातील प्रतिस्पर्धी प्रादेशिक दावे, 1962 च्या युद्धाशी संबंधित आहेत. केवळ चीनसोबत असलेले संबंधच नाही तर बारावीच्या पाठय़पुस्तकातील ‘पॉलिटिक्स इन इंडिया फ्रॉम इंडिपेंडन्स’मध्येही ‘आझाद पाकिस्तान’ हा शब्द बदलून ‘पाकिस्तानव्याप्त कश्मीर’ असा करण्यात आला आहे.