Mumbai crime news – पतीला सोडचिठ्ठी दिली नाही म्हणून प्रेयसीच्या मुलीचे अपहरण

पतीला सोडचिठ्ठी देऊन आपल्याशी रेशीमगाठ बांधत नाही म्हणून प्रियकराची सटकली. रागाच्या भरात त्याने विवाहित प्रेयसीच्या साडेपाच वर्षीय मुलीचे अपहरण केले. मुलीला घेऊन तो कोलाकाताला पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र नागपाडा पोलिसांनी कसोशीने तपास करीत अन्य पोलीस पथकांच्या मदतीने शेगाव स्थानकात आरोपीला पकडले व  चिमुकलीची त्याच्या ताब्यातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

रोतीन घोष  (34) असे त्या आरोपी मजनूचे नाव आहे. मूळचा बंगालचा असलेला रोतीन नेरूळ येथे राहतो. आठ महिन्यांपूर्वी त्याची बंगालचीच असलेल्या पण सध्या कामाठीपुरा येथे राहणाऱ्या विवाहितेशी ओळख झाली. दोघांचे प्रेमसंबंध जुळले.

दरम्यान, रोतीनने तिच्याकडे पहिल्या पतीला सोडचिठ्ठी दे आणि माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला होता. मात्र विवाहित प्रेयसीने तसे करण्यास नकार दिल्याने रोतीनची सटकली आणि त्याने प्रेयसीच्या पाच वर्षे सहा महिने वयाच्या मुलीचे मंगळवारी अपहरण केले. रोतीन मुलीला घेऊन गेल्याचे समजताच विवाहितेने नागपाडा पोलीस ठाण्यात जाऊन अपहरणाची तक्रार दिली.

याची तत्काळ दखल घेत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कदम, किरण चौगुले, सपोनि सोमनाथ काळे, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर शेंडगे, सिद्धार्थ यशोद, रामप्रसाद चंदवाडे, विशाल चौधरी, गोरे, नरेश घाग, प्रदीप मराठे व पथकाने तपास सुरू केला.  तांत्रिक बाबींचा अभ्यास केला असता आरोपी हा नाशिक येथील इगतपुरी येथे असल्याचे आढळून आले. त्यामुळे तो रेल्वेने कोलकाता येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजून आले. त्यानुसार अधिक चौकशी केल्यावर आरोपी एलटीटी येथून शालिमार एक्प्रेसने जात असल्याचे निष्पन्न झाले.

अखेर शेगावात गाठला

शालिमार एक्प्रेसचा इगतपुरीनंतर चाळीसगाव थांबा असल्याने नागपाडा पोलिसांनी रेल्वे पोलिसांना सतर्क करून गाडीत शोध घेण्यास सांगितले. रेल्वे पोलिसांनी चाळीसगाव स्थानकात आरोपीचा शोध घेतला, परंतु काहीच साध्य झाले नाही. त्यानंतर शालिमार एक्प्रेसचा पुढील थांबा शेगाव स्थानक असल्यामुळे त्यानुसार रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला आरोपी व मुलीचा फोटो पाठवून शोध घेण्यास सांगण्यात आले. शिवाय स्थानक आल्यावर आरोपी बाथरूममध्ये लपत असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली. मग शेगाव स्थानकात पोलिसांनी गाडी तपासली असता रोतीन त्या मुलीला घेऊन गाडीतल्या बाथरूममध्ये लपलेला आढळून आला. नागपाडा पोलिसांनी लगेच शेगाव गाठून आरोपी आणि मुलीला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.