उन्हाच्या तडाख्यामुळे महागाई भडकणार! रिझर्व्ह बँकेला चिंता; जागतिक तणावामुळे पेट्रोल, डिझेलचे दरही भडकणार

उन्हाच्या तडाख्यामुळे जनता त्रस्त झाली असतानाच आता महागाईचे चटके आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच काही देशांमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींवरही परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर भडकू शकतात अशी चिंता रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्याच्या बुलेटीनमध्ये उन्हाळा, अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलाचा थेट संबंध महागाईशी असल्याचा उल्लेख केला आहे. 1850 नंतरचा सर्वात कडक उन्हाळा मार्च 2024 मध्ये नोंदवला गेला, असे जागतिक हवामान एजन्सीने म्हटले आहे, याकडे रिझर्व्ह बँकेने लक्ष वेधले. त्यामुळे महागाई आणखी वाढण्याचा धोका आहे. किरकोळ महागाई दर कन्झुमर प्राईज इंडेक्सवर अवलंबून आहे. गेले दोन महिने महागाईचा दर 5.1 टक्के होता. मार्चमध्ये त्यात पिंचित घट होऊन 4.9 टक्के झाला. मात्र, महागाईचा दर आणखी वाढू शकतो.

दरवर्षी 8 ते 10 टक्के आर्थिक विकास दर हवा

पुढील तीन दशकात विकासाच्या आकांक्षा, ध्येय पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थानला पुढील दहा वर्षाच्या काळात दरवर्षी आर्थिक विकासाचा दर 8 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढवला पाहिजे. डेमोग्राफिक डिव्हिडेंटचा लाभ मिळण्यासाठी हा दर प्रतिवर्षी 8 ते 10 टक्के आवश्यक आहे, असे स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेने मांडले आहे. तसेच सध्या हिंदुस्थानच्या जीडीपी वाढीचा दर वाढत असल्याचेही म्हटले आहे.

जागतिक स्तरावर रशिया-युव्रेन युद्ध, इस्त्रायल-पॅलेस्टाईन हमास युद्ध आता इराण-इस्त्र्यालमधील तणाव या घडामोडी याचा अप्रत्यक्ष उल्लेख रिझर्व्ह बँकेने केला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे कच्च्या तेलांच्या किमती वाढू शकतात. पर्यायाने यामुळे इंधन दरवाढ होऊ शकते. याचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे.