चॅम्पियन्स लीगला संजीवनी? बीसीसीआय, सीए, ईसीबी यांच्यात लीग सुरू करण्यासाठी चर्चा

दहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या चॅम्पियन्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला संजीवनी देण्यासाठी क्रिकेट जगतातील तीन दिग्गज संघटना सरसावल्या आहेत. हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) व इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांनी या लीगमध्ये रस दाखवला असून ती पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा आणि बोलणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या लीगचे पुनर्जीवन लाभले तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही.

2014 मध्ये शेवटची चॅम्पियन्स लीग स्पर्धा खेळली गेली होती. तेव्हा काही कारणास्तव ही लीग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या लीगमध्ये 3 आयपीएल संघांनी यात भाग घेतला होता. चेन्नई सुपर किंग्जने अंतिम लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकाविले होते. त्या वर्षी या स्पर्धेत हिंदुस्थानचे तीन, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन आणि पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी एक संघ सहभागी झाले होते. चॅम्पियन्स लीग स्पर्धा 2009 ते 2014 या कालावधीत झाली होती. या काळात एकूण 6 हंगाम खेळले गेले. त्यापैकी 4 हिंदुस्थानात आणि 2 दक्षिण आफ्रिकेत झाले. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने दोन वेळा या लीगचे विजेतेपद पटकावले, तर ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स आणि सिडनी सिक्सर्सने प्रत्येकी एकवेळा बाजी मारली होती.