टी-20 वर्ल्ड कपला मुंबईचाच आवाज घुमणार; रोहित शर्मासह सूर्या, जयस्वाल, दुबेचे स्थान जवळ जवळ पक्के

आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम 15 सदस्यीय संघात स्थान मिळवण्यासाठी सर्वच खेळाडूंमध्ये जोरदार शर्यत लागली आहे आणि या शर्यतीत मुंबईचाच आवाज घुमण्याची दाट शक्यता आहे. पॅरेबियन बेट आणि अमेरिकेत होणाऱया या टी-20 वर्ल्ड कपचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपविले जाणार असून या संघात सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाल आणि मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी आपले स्थान जवळ जवळ निश्चित केल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे या यादीत श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूरच्याही नावाचा समावेश आहे. आजवरचा इतिहास पाहता वर्ल्ड कपमध्ये मुंबईचे तीन किंवा चार खेळाडू असतात. त्यामुळे यंदाही टी-20 वर्ल्ड कपमध्ये मुंबईचाच आवाज घुमणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच्या 15 सदस्यीय संघात कर्णधार रोहित शर्मासह श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर हे चार खेळाडू होते. आताही तोच आकडा कायम असेल. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सूर्यकुमार चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतला असून तो पुन्हा तळपायला लागला आहे. मधल्या फळीत त्याचे स्थान पक्के मानले जात आहे. मात्र आता मुंबईचाच शिवम दुबे वादळी खेळतोय. त्याने गेल्या सहा सामन्यांत ना. 34, 51, 18, 45, 28 आणि 30 अशा खेळय़ा खेळला आहे. या खेळय़ांमुळे त्याने मधल्या फळीतील खेळाडूंमध्ये जोरदार चुरस निर्माण केली आहे. शिवम या शर्यतीत सर्वात पुढे आहे. कारण तो झंझावाती फलंदाजीसह आपल्या फिरकीने प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवतोय.

यशस्वी जयस्वालही आघाडीवर

गेल्या महिन्यात इंग्लंडविरुद्धची मालिका गाजवणारा यशस्वी जयस्वाल हिंदुस्थानच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये फिट आणि हिट असलेला सलामीवीर आहे. आगामी टी-20 वर्ल्ड कपमध्येही तो रोहित शर्मासह सलामीला उतरण्यासाठी पॅड बांधून तयार आहे. मात्र आयपीएलमध्ये जयस्वाल वारंवार अयशस्वी ठरतोय. राजस्थान रॉयल्सचा हा सलामीवीर गेल्या पाचही सामन्यांत एकही अर्धशतकी (39, 24, 0, 10, 5) खेळी करू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या फॉर्मची राजस्थानच नव्हे तर हिंदुस्थानी क्रिकेट चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. जयस्वालचे संघातील स्थान पक्के असले तरी त्याच्या फलंदाजीला सूर गवसला नाही तर ते डळमळीतसुद्धा होऊ शकते. इतकी जबरदस्त शर्यत सलामीच्या जागेसाठी लागली आहे.

अय्यर, ठाकूर स्पर्धेबाहेर

गेल्यावर्षी हिंदुस्थानच्या वर्ल्ड कप संघात असलेले श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर हे दोघे मुंबईकर अचानक स्पर्धेबाहेर फेकले गेले आहेत. दोघेही आयपीएलमध्ये खेळत असले तरी दोघांनी अद्याप लक्षवेधी कामगिरी केलेली नाही. त्यामुळे हे दोघे पुन्हा संघात येण्याची शक्यता अंधुक झाली आहे. तसेच मुंबईचे पृथ्वी शॉ, अंगक्रिश रघुवंशी आणि तुषार देशपांडे आपल्या खेळाने निवड समितीचे लक्ष आपल्याकडे खेचत असले तरी या घडीला ते संघात येतील इतकी जोरदार कामगिरी त्यांच्याकडून झालेली नाही.