रोखठोक – हिटलर व आपला देश

शिवतीर्थावरा दसरा मेळाव्यात श्री. उद्धव ठाकरे यांनी हिटलरचा संदर्भ  दिला. हिटलरने जर्मनीत ‘अंधभक्त’ निर्माण केले.  आपल्या देशातही आज वेगळे चित्र नाही. गांधींना गोळ्या घाला, असे हिटलरचे इंग्रजांना सांगणे होते. देशात गांधींच्या पुतळ्यांवर, तसबिरींवर ‘गोळ्या’ मारण्याचे सार्वजनिक उपक्रम गेल्या

10 वर्षांत सुरू झाले आहेत.

दसरा मेळाव्यात श्री. उद्धव ठाकरे यांनी हिटलरचा संदर्भ दिला. हिटलरला कुटुंब नव्हते. कुटुंब व्यवस्थेवर विश्वास नसलेल्या व्यक्तीच्या हाती देश सोपवणे हा धोका आहे, असे श्री. ठाकरे म्हणाले. अशी माणसे भावनाशून्य असतात. हिटलरलाही शेवटी पश्चात्ताप (?) झाला व त्याने 30 एप्रिलला स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पश्चात्ताप नसावा, भीती व नैराश्यातून त्याने आत्महत्या की हे खरे. हिटलरने आपल्या विरोधकांना संपवले. आपण लोकप्रिय आहोत व जनतेचा पाठिंबा फक्त आपल्यालाच आहे असा देखावा त्याने निर्माण केला. हिटलरने त्याच्या प्रचारकांना सांगितले होते, ‘प्रतिष्ठित, प्रसिद्ध व्यक्तीवर 10 बिनबुडाचे आरोप करा. आरोप सातत्याने करीत राहा. हळूहळू जनतेला 10 पैकी 6 आरोप खरे वाटू लागतात. मग आपले काम झाले!’ जर्मनीत हिटलर अधिकारावर येण्यापूर्वी वॅमार प्रजासत्ताक होते. त्याची राज्यघटना आदर्श होती, पण ती राबविणारे पक्षच दुर्बल होते. त्यांनी आपल्या वर्तनाने लोकांत संसदीय लोकशाहीसंबंधी घृणा निर्माण केली व हिटलरचा मार्ग सुकर केला.  आपल्याकडेही असेच होणार आहे काय? हिटलरनेही पुढे संसदीय लोकशाही खतम करून स्वतःचाच उदो उदो करणारे लोक व संस्था निर्माण केल्या. कायदा, राज्यघटनेला न जुमानता राज्य केले. त्यालाही जगाचा नेता व्हायचे, संपूर्ण जग टाचेखाली आणायचे होते, पण हिटलरचाच अंत झा.

इंडिया आणि भारत

‘इंडिया’ नावाची भाजपास अचानक घृणा वाटू  लागली. कारण ‘इंडिया’ आघाडीने मोदींसमोर आव्हान निर्माण केले. त्यामुळे शाळेच्या क्रमिक पुस्तकांतूनही ‘इंडिया’ हटवून ‘भारत’ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. इतक्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर देशात सार्वमत व्हावे, चर्चा व्हावी, संसदेत चर्चा करावी, असे सरकारला वाटले नाही. त्यांच्या मनात आले व त्यांनी ते केले. या गरीब देशाचा पैसा या पकारचे तमाशे करण्यासाठी खर्च होत राहणार काय, हा खरा पश्न आहे. पण चर्चा होत नाही. आधी  लष्करी अधिकाऱयांना व आता प्रशासकीय अधिकाऱयांना निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यास सांगितले. ही गुलाममगिरी व हुकूमशाहीची पक्की सुरुवात आहे. संसदेत यावर पश्न विचारले की सत्ताधारीच आरडाओरड करणार. संसदीय लोकशाहीची मुख्य संस्था म्हणजे संसद आणि संसदेचा गाभा म्हणजे चर्चा. या लोकशाहीचे सत्ताधारी व विरोधी पक्ष हे आधार असतात. इंग्लंडमध्ये द्विपक्षीय संसदीय लोकशाही आहे. यासंदर्भात मेकॉलेने सत्ताधारी व विरोधी पक्षांना हरणाच्या चार पायांची उपमा दिली आहे. हरणाचे चारही पाय सारखेच महत्त्वाचे असतात. एमरी यांनी ब्रिटिश पार्लमेंटची वैशिष्ट्ये सांगणारा एक लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात, ‘पार्लमेंटचा मुख्य हेतू कायदा करणे किंवा राज्य करणे हा नाही. सरकार वा सभासदाने मांडलेल्या विधेयकावर चर्चा करणे हा आहे. या चर्चेत भाग घेणारा सत्ताधारी पक्ष हा संवेदनशील असला पाहिजे आणि विरोधी पक्ष हा जबाबदार असला पाहिजे.’ स्पष्टच सांगायचे तर संसदीय लोकशाही म्हणजे मनमानी नव्हे. त्याकरिता शिस्त व संयम लागतो. दुसऱयाचे म्हणणे ऐकून घेण्याचे कसब लागते. सहिष्णुता हा संसदीय लोकशाहीचा आत्मा आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे ऐकलेच पाहिजे, त्याचप्रमाणे विरोधी पक्षाने सत्तेवरील पक्षाला सहकार्य केले पाहिजे. रस्त्यावरच्या लढाया रस्त्यावर. लॉर्ड सायमन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, घटनाच मोडून पडण्यापेक्षा दुसऱया बाजूचा विजय झाला तरी हरकत नाही, अशा वृत्तीचे लोक जोपर्यंत पार्लमेंटमध्ये आहेत तोपर्यंत आपली संसदीय पद्धती चालू राहील. निवडणुकीत बहुमत मिळाले तरीही विरोधी पक्षाला कस्पटासमान लेखून चालणार नाही. हिंदुस्थान तिसरी आर्थिक महासत्ता होणार असा प्रचार सुरू आहे, पण हिंदुस्थानातील संसदीय लोकशाही टिकेल काय? टिकली तर ती कुणा एखाद्याची बटीक म्हणून किंवा रखेल म्हणूनच राहील काय? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही राबविणे ही देशभक्ती नाही. अरविंद केजरीवाल यांनी काल सांगितले, ‘भाजपचा पराभव करणे हीच देशभक्ती आहे.’ भाजपचा पराभव म्हणजे हुकूमशाहीचा पराभव असेच त्यांना सांगायचे असावे.

पुतीन पडले!

पुतीन हे रशियाचे अध्यक्ष आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आला व ते बेडरूममध्येच कोसळले. त्याचे वृत्त जगभरात पोहोचले. पण ‘पुतीन हे ठणठणीत बरे आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी फक्त अफवा आहेत,’ असे खुलासे क्रेमलिनमधून होत आहेत. हुकूमशहा विकलांग किंवा आजारी पडल्याच्या वृत्तानेच देशात बंडाळ्या माजतात. स्टॅलिन मृत्युशय्येवर असतानाही तो ठणठणीत असल्याचे वृत्त बाहेर पसरवले जात होते. हुकूमशाहांचे हे असे भय सर्वत्रच असते. रशिया व युक्रेन युद्ध अद्याप संपलेले नाही. या युद्धात पंतप्रधान मोदी यांनी मध्यस्थी केल्याचे त्यांचे अंधभक्त सांगतात. पण युद्ध सुरूच आहे. मोदी यांनी इस्रायल व हमास युद्धातही मध्यस्थी केल्याचे जाहीर झाले आहे. प्रत्यक्षातले चित्र वेगळे आहे. हुकूमशहा, मग तो कोणत्याही देशाचा असो, तो स्वतःभोवती एक वलय निर्माण करतो व त्यासाठी अंधभक्तांच्या टोळ्या पोसल्या जातात. आज ‘आयटी’ टोळ्या आहेत. हिटलरच्या काळात हे सर्व गोबेल्स करीत होता. हिटलरचे कौतुक आपल्याकडे काही लोकांना आहे, जसे गोडसेंचे आहे; पण हिटलर हिंदुस्थानचा द्वेष करीत होता. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळू नये. स्वातंत्र्य उपभोगण्याच्या लायकीचे येथील लोक नाहीत, असे त्याचे पक्के मत होते. हिटलरच्या काळात जर्मन जनतेवर मुक्तपणे जगण्याबाबत निर्बंध होते. आपल्या देशाची परिस्थितीही आज वेगळी नाही. लहरी राजापमाणे निर्णय घेऊन जनतेवर लादले जातात. सर्व घटनात्मक संस्था सरकारच्या ओंजळीने पाणी पितात. राजकीय विरोधकांना बाण्याचे, चर्चा करण्याचे स्वातंत्र्य नाही.

सध्याच्या राज्यकर्त्यांच्या मनात महात्मा गांधींविषयी प्रेम नाही. जगाला दाखविण्यासाठी श्री. मोदी व त्यांचा पक्ष गांधी वंदनेचे सोहळे करतात, पण त्यांचे गांधीप्रेम खरे नाही. गेल्या दहा वर्षांपासून गांधींवर गोळ्या झाडणाऱया गोडसेचे पुतळे उभारले गेले व गोडसेच्या ‘पुण्यतिथी’चे सोहळे साजरे होतात. गांधींच्या पुतळ्यांवर व तसबिरीवर गोळ्या मारण्याचे कार्यक्रम या दिवशी होतात. यात पुन्हा हिटलर आहेच. भारतीय स्वातंत्र्यलढा संपवायचा असेल तर गांधींना गोळ्या घा, असा सल्ला हिटलरने इंग्रजांना दिला होता. आधी गांधींना गोळ्या घा. त्यांना संपवा, मग हळूहळू इंग्रजविरोधकांना गोळ्या घा, असे हिटलर म्हणाला. हिंदुस्थानला ‘स्वातंत्र्य’ हवे असे सांगणाऱयांची आज मुस्कटदाबी होते. थेट गोळ्या घालता येत नाहीत. त्यामुळे खोट्या गुन्ह्यांत अडकवून विरोधकांना तुरंगात सडवले जाते. हिटलरच्या ‘नाझी’ फौजेच्या धर्तीवरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ निर्माण झाली असे बोलले जाते, पण ‘नाझी’ व त्यांचा हिटलर हिंदू आणि हिंदुस्थानविरोधी होता. हिटलर ज्यूंचा तिरस्कार करीत होता. साठ लाख ज्यूंना त्याने मारले. नव्या भारतीय राजवटीत मुसलमानांचा द्वेष करा, जमेल तर खतम करा अशीच भावना निर्माण केली व ती कृतीत उतरवली. या द्वेषाच्या राजकारणाचा अंतही शेवटी भयंकर झाला. हिटलरच्या डोळ्यासमोर जर्मनीचा पराभव झाला. बाम्बहल्ल्यांत लाखो जर्मन नागरिक मेले.  हिटलर भित्र्यापमाणे चॅन्सेलर हाऊसच्या आवारात बंकर्समध्ये लपून बसला व शेवटी रशियन फौजांच्या भयाने त्याने आपल्या प्रेयसीसह आत्महत्या केली. जर्मनीत आज हिटलरची आठवण कोणीच काढत नाही.

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर म्हणाले, ज्याला कुटुंब नाही, कुटुंब व्यवस्थाच मान्य नाही त्यांच्या हाती देश सोपवणे हा सगळ्यात मोठा धोका आहे.

ते खरेच आहे!

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]