सामना अग्रलेख – आता चिनी न्यूमोनिया!

यापूर्वी अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमुळे जग वेगवेगळ्या संकटांत सापडत असे. आता चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगावर संकट येत आहे. कधी हे संकट आर्थिक नाकेबंदीचे असते, कधी परदेशी भूभाग गिळंकृत करण्याचे असते तर कधी जगाला जीवघेण्या आजारांच्या खाईत लोटणारे असते. या आजारांमुळे चीनमध्येही हाहाकार माजतो, परंतु त्याचा परिणाम चीनच्या पाताळयंत्री उद्योगांवर होत नाही. आता चिनी न्यूमोनिया या नवीन रहस्यमय आजाराने जगाला पुन्हा अॅलर्ट मोडवर टाकले आहे. हा नवीन विषाणू किती घातक ठरतो, जगात हाहाकार माजवतो की नाही, हे येणारा काळच सांगेल, परंतु खरा प्रश्न आहे तो चीनच्या पाताळयंत्री व्हायरसचा. हा विषाणू जेव्हा बाटलीबंद होईल तेव्हाच जगावर सतत कोसळणारे नव्या आजारांचे संकट टळू शकेल.

चीन म्हणजे गूढ आजार, गूढ संशोधन आणि संशय वाढविणारे वातावरण असे एक समीकरणच बनले आहे. विशेषतः कोरोना महामारीपासून चीनवरील हा ठपका आणखी गडद झाला आहे. आताही चीनमध्ये अचानक गूढ न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे. कोरोनाप्रमाणेच हा आजार वेगाने पसरला आहे. प्रामुख्याने शाळकरी मुले या आजाराच्या कचाटय़ात सापडली आहेत. चीनमधील अनेक रुग्णालये न्यूमोनियाग्रस्त मुलांनी भरली आहेत. लहान मुलांनाच या अनोळखी आजाराने ‘लक्ष्य’ केले आहे. त्याचे नामकरण ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ असे करण्यात आले असून त्या विषाणूला ‘एच 9 एन 2’ असे नाव देण्यात आले आहे. थोडक्यात, फ्लू, स्वाईन फ्लू, कोरोना आणि आता हा नवीन ‘एव्हियन इन्फ्लुएंझा’ असे तडाखे चीन जगाला देत आहे. नवा आजारही प्रसंगी कोरोनाप्रमाणे गंभीर होणारा आहे. दोनच महिन्यांपूर्वी काही देशांत कोरोना विषाणूचा पुन्हा उद्रेक झाला होता. अमेरिकेत कोरोना रुग्णांचे इस्पितळात दाखल होण्याचे प्रमाण 24 टक्क्यांनी वाढले होते. ब्रिटनमध्ये कोरोनाचा ‘एरिस’ म्हणजे ‘ईजी.5.1’ हा

नवीन उपप्रकार

आढळून आला होता. ‘कोविड 19’, मग ‘ओमायक्रॉन’ आणि नंतर ‘एरिस’ असा कोरोना विषाणूचा प्रवास आतापर्यंत झालेला आहे. त्यात कोरोनाचा ‘बीए.2.86’ हा नवा अवतार पाण्यात सापडल्याने कोरोनाचा संसर्ग पाण्यातूनही होऊ शकतो, असा शोध दोन महिन्यांपूर्वी लागला होता. कोरोनाचे हे इशारे-नगारे थांबत नाहीत तोच आता नव्या ‘चिनी आजारा’ने जगाची चिंता वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही नेहमीप्रमाणे त्याबाबत सावधगिरीच्या सूचना जगाला दिल्या आहेत. अर्थात, नवनवीन चिनी आजारांवरून ‘चिंता, इशारे आणि सूचना’ यांच्या फक्त पिपाण्याच ही जागतिक वगैरे म्हटली जाणारी संघटना वाजवत असते. वास्तविक सर्व आजार चीनमधूनच प्रसारित होत आहेत हे एक उघड सत्य आहे. चीनमधील वुहान प्रयोगशाळा, तेथील विषाणू आणि जैविक संशोधन, त्यातून जन्मास आलेले घातक विषाणू व त्यांच्या उपप्रकारांनीच जगावर नवनवीन आजारांची संकटे कोसळत आहेत. हे सगळे स्वयंस्पष्ट असूनही जागतिक वगैरे म्हणवून घेणारी आरोग्य संघटना ना चीनला जाब विचारू शकते, ना चीनमधून पसरणाऱ्या रहस्यमय आजारांचा प्रसार रोखू शकते. आरोग्य संघटनाच नव्हे, तर एरवी स्वतःला

जागतिक महासत्ता

म्हणवून घेणारे आणि छोटय़ा देशांवर हुकमत गाजविणारे देश आणि ‘नाटो’सारख्या संघटनाही चीनच्या दादागिरीसमोर शेपूट घालतात. त्यामुळेच विस्तारवादी महत्त्वाकांक्षेने पछाडलेला चीन जगाला कुठल्या ना कुठल्या संकटात ढकलतोच आहे. यापूर्वी अमेरिका आणि रशिया या दोन महासत्तांमुळे जग वेगवेगळ्या संकटांत सापडत असे. आता चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे जगावर संकट येत आहे. कधी हे संकट आर्थिक नाकेबंदीचे असते, कधी परदेशी भूभागावर घुसखोरी करून तो गिळंकृत करण्याचे असते तर कधी जगाला जीवघेण्या आजारांच्या खाईत लोटणारे असते. वास्तविक या आजारांमुळे खुद्द चीनमध्येही हाहाकार माजतो, परंतु त्याचा परिणाम चीनच्या पाताळयंत्री उद्योगांवर होत नाही. तीन वर्षांपूर्वी जगावर कोसळलेली आणि लाखो लोकांचे हकनाक जीव घेतलेली कोरोना महामारी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आता चिनी न्यूमोनिया या नवीन रहस्यमय आजाराने जगाला पुन्हा अॅलर्ट मोडवर टाकले आहे. हा नवीन विषाणू किती घातक ठरतो, जगात हाहाकार माजवतो की नाही, हे येणारा काळच सांगेल, परंतु खरा प्रश्न आहे तो चीनच्या पाताळयंत्री व्हायरसचा. हा विषाणू जेव्हा बाटलीबंद होईल तेव्हाच जगावर सतत कोसळणारे नव्या आजारांचे संकट टळू शकेल.