सामना अग्रलेख – सोरेन अटकेचा धिक्कार!

‘ईडी’चा वापर करून भाजप लोकशाही मारत आहे. विरोधकांना छळत आहे. भाजपचे लोक आजही आणीबाणीच्या आठवणी काढून कळवळतात. मग आजचा मोदी काळ आणीबाणीपेक्षा भयानक आहे. आणीबाणी काळात जयप्रकाश नारायण, चरणसिंग आदी नेत्यांनी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले होते की, ‘‘सरकारचे चुकीचे आदेश पाळू नका, हीच देशसेवा आहे.’’ आजही आम्ही तेच आवाहन करीत आहोत. अधिकाऱयांनी चुकीचे आदेश पाळणे हा देशद्रोहच ठरेल. मोदी-शहा येतील व जातील. अनेक जगज्जेते आले गेले, तेथे भाजपवाले कोण? देश टिकायला हवा. भारतमातेला अमरत्व आहे, मोदी-शहांना नाही. हेमंत सोरेन यांच्या अटकेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. देश लुटणारे बाहेर व सोरेन आतमध्ये. मोदी काळात यापेक्षा वेगळे काय घडणार?

भारतीय जनता पक्षाच्या ‘ईडी’ विभागाने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यास अशा पद्धतीने अटक करणे योग्य नाही. इतिहासात असे घडले नव्हते. सोरेन यांच्या अटकेसाठी रांची परिसरात सात हजार सशस्त्र जवान तैनात केले होते. इतकी तयारी चीनच्या सीमेवर केली असती तर चिनी सैन्य भारतीय हद्दीत घुसून त्यांनी हजारो वर्ग मैल जमीन ताब्यात घेतली नसती, पण सहा-सात एकर जमिनीचे एक जुने प्रकरण उकरून ‘ईडी’ने हेमंत सोरेन यांना ताब्यात घेतले. देशात भाजप व त्यांच्या मालकांचा दहशतवाद आता उच्च थरावर पोहोचला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भाजपच्या ‘ईडी’ विभागाने सातवे समन्स पाठवले आहे व केजरीवाल यांनाही कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे दिसत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटवर्तीय लोकांवर, आर्थिक व्यवहार सांभाळणाऱया लोकांवर ‘ईडी’ने गेल्या दोनेक महिन्यांत धाडी टाकल्या व लगेच नितीश कुमार हे भाजपशी चौथे लग्न लावून नांदायला गेले. हेमंत सोरेन यांनी भाजपपुढे वाकण्यास नकार दिला व त्याची पिंमत त्यांनी चुकवली. देशाच्या दृष्टीने हेमंत सोरेन हे ‘हिरो’ ठरले आहेत. हेमंत सोरेन यांच्या पाठीशी झारखंड विधानसभेत पूर्ण बहुमत होते. जनतेचा त्यांना पाठिंबा आहे, पण लोकसभेत हेमंत सोरेन झारखंडमध्ये एकही जागा मिळू देणार नाहीत या भयाने त्यांना अटक केली. मोदी सरकार विरोधकांवरील या कारवायांसाठी कथित घोटाळय़ांचा मुखवटा पुढे करीत असले तरी भ्रष्टाचाराबाबतचा या सरकारचा खरा चेहरा आता समोर आला आहे. मोदी काळात भारतात भ्रष्टाचार वाढल्याचे उघड झाले आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने जगातील 180 देशांचा भ्रष्टाचार अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार

भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत

भारत 93 व्या स्थानावर आहे. 2022 मध्ये भारत 85 व्या स्थानावर होता. याचा सरळ अर्थ असा की, मोदी काळात भारताची भ्रष्टाचारात मोठीच भरभराट झाली असून मोदी फक्त भ्रष्टाचारावर पोकळ भाषणे देत फिरत आहेत. पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंडळींना भ्रष्टाचाराचे अजिबात वावडे नाही. किंबहुना ज्यांना भ्रष्टाचारात सर्वाधिक कलंक लागले आहेत अशांना भाजपात सामील करून पंतप्रधान मोदी त्यांना मानसन्मान देत आहेत. महाराष्ट्रातील अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल, यशवंत जाधव, भावना गवळी, स्वतः मुख्यमंत्री मिंधे यांची भ्रष्टाचारातील कर्तबगारी तसेच शौर्य पाहता कालच्या प्रजासत्ताक दिनी या सगळय़ांना विशेष नागरी पुरस्कार व शौर्य पदके देऊन त्यांचा सन्मान केला जाईल असे वाटले होते, पण त्या बदल्यात भाजपच्या ‘ईडी’ विभागाने झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवले व महाराष्ट्रात अजित पवार यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ‘क्लीन चिट’ देऊन इतिहास घडवला. परमबीर सिंग यांच्यावरील खंडणीसारखे गुन्हे मागे घेतले. राज्य आणि देश कसा चालला आहे व मोदी यांच्या मनात नेमके काय आहे ते यातून दिसले. अयोध्येतील जमीन व्यवहारातील मोठा घोटाळा भाजपच्या नेत्यांनी केला आहे, पण सात एकरच्या जमीन व्यवहारात ‘ईडी’ने मुख्यमंत्री सोरेन यांना अटक केली. चीनने भारताची जमीन गिळंकृत केली आहे. ती जप्त करायला ‘ईडी’ची पथके भाजपने सीमेवर पाठवायला हवीत, पण त्याऐवजी ‘ईडी’वाले दोन वार जमिनीच्या जप्तीत गुंतून पडले आहेत. पुन्हा फक्त हेमंत सोरेन यांच्या अटकेपुरतेच पेंद्रीय सत्तेचे हे

सूडनाटय़

मर्यादित राहिले नाही. अटकेनंतर हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिल्यावर सत्ताधारी आघाडीकडून त्यांचे उत्तराधिकारी म्हणून चंपई सोरेन यांचे नाव निश्चित झाले. लोकशाही संकेत आणि परंपरेनुसार राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेचे रीतसर निमंत्रण लगेच द्यायला हवे होते. मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन ठरावीक मुदतीत बहुमत सिद्ध करण्यास सांगायला हवे होते. मात्र राज्यपालांनी चंपई सोरेन यांना दोन दिवस ताटकळत ठेवले. मधल्या काळात सत्ताधारी आघाडीत पह्डापह्डी करून झारखंडमध्येही ‘खोके’शाहीचा प्रयोग करण्याचा पेंद्रीय सत्तापक्षाचा डाव यामागे होता हे उघड आहे. मात्र तो फसला असावा. म्हणूनच राज्यपालांनी नाइलाजाने शुक्रवारी चंपई सोरेन यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ देऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. चंदिगढच्या महापौरपदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकाऱयाला हाताशी धरून भाजपने सत्ताकारण केले, तर झारखंडमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून वेळकाढूपणा करीत सत्तेचा घोडेबाजार करण्याचा प्रयत्न झाला हे उघड आहे. ‘ईडी’चा वापर करून भाजप लोकशाही मारत आहे. विरोधकांना छळत आहे. याची पिंमत या तपास यंत्रणांच्या म्होरक्यांना चुकवावी लागेल. भाजपचे लोक आजही आणीबाणीच्या आठवणी काढून कळवळतात. हा कालखंड काळाकुट्ट होता असे ते सांगतात. मग आजचा मोदी काळ आणीबाणीपेक्षा भयानक आहे. आणीबाणी काळात जयप्रकाश नारायण, चरणसिंग आदी नेत्यांनी पोलीस व प्रशासकीय अधिकाऱयांना आवाहन केले होते की, ‘‘सरकारचे चुकीचे आदेश पाळू नका, हीच देशसेवा आहे.’’ आजही आम्ही तेच आवाहन करीत आहोत. अधिकाऱयांनी चुकीचे आदेश पाळणे हा देशद्रोहच ठरेल. मोदी-शहा येतील व जातील. अनेक जगज्जेते आले गेले, तेथे भाजपवाले कोण? देश टिकायला हवा. भारतमातेला अमरत्व आहे, मोदी-शहांना नाही. हेमंत सोरेन यांच्या अटकेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. देश लुटणारे बाहेर व सोरेन आतमध्ये. मोदी काळात यापेक्षा वेगळे काय घडणार?