सामना अग्रलेख – कश्मीर ते मणिपूर ‘दडपलेले’ सत्य

गेले काही दिवस मणिपूर शांत झाले असावे असा भास निर्माण झाला होता. मात्र मंगळवारच्या हिंसाचाराने ते राज्य ‘अशांत’च आहे, तेथील वांशिक विद्वेषाची धग जराही कमी झालेली नाही हेच स्पष्ट झाले. केंद्रातील सरकार जम्मू-कश्मीरमधील शांततेचे प्रवचन उठता बसता करीत असते. मात्र अलीकडील ‘टार्गेट किलिंग’च्या वाढत्या घटनांनी तेथील शांततेचा ‘मुखवटा’ गळून पडला. आता मणिपूरमधील शांततेचे ‘दडपलेले’ सत्यही चव्हाट्यावर आले आहे. देशाची अखंडता धोक्याच्या वळणावर उभी आहे आणि राज्यकर्ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात मशगूल आहेत.

मणिपूरविषयीच्या बातम्या मधल्या काळात दिसत नसल्याने चार-पाच महिने सलग हिंसाचारात होरपळणारे हे राज्य ‘शांत’ झाले असावे, असे देशातील जनतेला वाटत होते. मात्र मंगळवारच्या एका घटनेने हा समज खोटा ठरला आहे. जातीय विद्वेष आणि हिंसाचार, त्यातून होणारा रक्तपात, केली जाणारी अपहरणे, हत्याकांडे हे सगळे त्या ठिकाणी अजिबात थांबलेले नाही. मंगळवारी मैतेई समाजाच्या काही लोकांनी पाच जणांचे अपहरण केले. त्यात एक वृद्ध, दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश होता. त्यापैकी वृद्धाला नंतर अपहरणकर्त्यांनी सोडून दिले, परंतु इतर चौघांचा अद्यापि ठावठिकाणा लागलेला नाही. हे कुटुंबीय एका सैनिकाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे ‘अपहरणकर्ते आणि अपहरण केलेल्यांचा शोध सुरू आहे, अपहरण केलेल्या चौघांचा जीव वाचविण्याचा आणि त्यांची सुखरूप सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ अशी नेहमीची तबकडी सरकारतर्फे वाजविण्यात आली आहे. मात्र या घटनेचे हिंसक पडसाद उमटायचे ते उमटलेच. कुकी समाजाने प्रतिक्रिया म्हणून त्या भागात निदर्शने केली. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या. त्यामुळे त्या परिसरात आता

पुन्हा हिंसाचार

सुरू झाला आहे. मणिपूर सरकार आणि पेंद्रातील सत्ताधारी मात्र सोयिस्कर मौन बाळगून आहेत. देशाचे एक संवेदनशील सीमावर्ती राज्य सलग सहा-सात महिने जातीय आणि वांशिक हिंसाचारात जळते आहे, त्या रक्तपातात शेकडो निरपराध्यांचा बळी जात आहे. देशाच्या अखंडतेच्या दृष्टीने हे किती धोकादायक आणि घातक आहे हे सांगण्याची गरजच नाही. त्यात सध्याचे राज्यकर्ते स्वतःला राष्ट्रीय, हिंदुत्व आणि हिंदुस्थानचे ‘एकमेव’ तारणहार वगैरे समजतात. तरीही मणिपूर शांत आणि स्थिर होण्याची चिन्हे नाहीत. कारण मणिपूरच्या प्रश्नाबाबत ‘कळूनही वळत नाही’ अशीच केंद्र सरकारची अवस्था आहे. त्यामुळेच ना मणिपूरमधील वांशिक वणवा विझला आहे ना त्याची धग कमी झाली आहे. मंगळवारची घटना आणि त्याची उमटलेली तत्काळ प्रतिक्रिया तेथील जातीय ज्वालामुखीचे स्पह्ट सुरू असल्याचाच पुरावा आहे. कुकी आणि मैतेई समाजातील वैमनस्याची दरी जराही कमी झालेली नाही. मंगळवारी अपहरण झालेले चौघे कुकी समाजाचे आहेत. ते कांगपोकपी येथे जात होते. त्यांच्यावर प. इम्फाळ जिल्हय़ात मैतेई समाजाच्या काही लोकांकडून हल्ला झाला आणि नंतर

चौघांचे अपहरण

करण्यात आले. त्यावर कुकी समाजाच्या लोकांनी कांगपोकपी आणि प. इम्फाळ या दोन्ही भागांत गोळीबार करून हिंसाचार केला. कांगपोकपी हा कुकीबहुल भाग आहे तर प. इम्फाळमध्ये मैतेई समाजाचे प्राबल्य आहे. त्यामुळेच 7 नोव्हेंबर रोजी त्या भागात हिंसक क्रिया-प्रतिक्रिया उमटल्या. त्या तेथील मनामनात जातीय तणाव आणि वांशिक विद्वेष किती पराकोटीचा भिनला आहे, या दाहक वास्तवाची जाणीव करून देणाऱया आहेत. मात्र पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात मग्न असलेले पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना याची जाणीव आहे का? गेले काही दिवस मणिपूर शांत झाले असावे असा भास निर्माण झाला होता. मात्र मंगळवारच्या हिंसाचाराने ते राज्य ‘अशांत’च आहे, तेथील वांशिक विद्वेषाची धग जराही कमी झालेली नाही हेच स्पष्ट झाले. केंद्रातील सरकार जम्मू-कश्मीरमधील शांततेचे प्रवचन उठता बसता करीत असते. मात्र अलीकडील ‘टार्गेट किलिंग’च्या वाढत्या घटनांनी तेथील शांततेचा ‘मुखवटा’ गळून पडला. आता मणिपूरमधील शांततेचे ‘दडपलेले’ सत्यही चव्हाटय़ावर आले आहे. देशाची अखंडता धोक्याच्या वळणावर उभी आहे आणि राज्यकर्ते पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारात मशगूल आहेत.