पद मिळाल्यावर लोक चिकटून राहतात… सचिन पायलट यांची खंत

तरुणांनी राजकारणासोबतच प्रत्येक क्षेत्रात पुढे यायला हवे. तरुणांना संधी मिळावी यासाठी मी सर्वत्र प्रयत्न करतो. मात्र राजकारणात अडचण अशी असते की, पद मिळाल्यावर लोक त्याला चिटकून राहतात, अशी खंत कॉँग्रेस नेते सचिन पायलट यांनी व्यक्त केली.

देशाच्या राजकारणात तरुणांच्या भूमिकेबाबत एका कार्यक्रमात सचिन पायलट म्हणाले की, राजकारणातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे अनेक गोष्टी तुमच्या हातात नसतात. अनेक वेळा खूप काही करूनही यश मिळत नाही. जर तुमचा विश्वास असेल की तुम्हाला राजकारण करायचे आहे, तर तुम्ही कोणत्याही विचारधारेकडे झुकत असाल, त्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करा. राजकारणात जास्त परताव्याची अपेक्षा करू नका, असे त्यांनी सांगितले.

– आपल्या देशातील राजकीय पक्ष फक्त कोणता नेता निवडणूक जिंकू शकतो हे पाहतात हे राजकीय वास्तव आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे. एकदा निवडणूक जिंकणे ही फक्त सुरुवात आहे. त्यानंतर तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल का, हे पाहावे लागेल. तरुणांना राजकारणात संधी मिळाली तर ती दीर्घकाळ टिकेल.

सत्ताधाऱयांना नाही तर कुणाला प्रश्न विचारायचे

आम्ही सत्ताधाऱयांना महागाई, बेरोजगारी या मुद्दय़ांवर बोलण्याचे आवाहन केले होते, पण त्यांना तसे करायचे नाही. विरोधकांचे काम टीका करणे नाही, प्रश्न विचारणे नाही तर काम काय? सत्ताधाऱयांना नाही तर कुणाला प्रश्न विचारायचे असा सवाल करत सचिन पायलट यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

माझ्या इतक्या काँग्रेससाठी कोणीही धावा काढल्या नाहीत

पक्षाने माझ्याकडे सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. ते कर्तव्य मी पार पाडत आहे आणि निवडणूक जिंकू शकतील अशा लोकांना आम्ही मैदानात उतरवले आहे. निवडणूक जिंकणे हे आमचे काम आहे. मी काँग्रेससाठी जितक्या धावा केल्या आहेत तितक्या कोणीही मैदानात काढल्या नाहीत, असे सचिन पायलट म्हणाले.