सचिन वैद्य ठरले उत्कृष्ट छायाचित्रकार, गणेशोत्सवावर आधारित स्पर्धेत पटकावले पारितोषिक

 अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि महाराष्ट्र ट्रव्हल फोटोग्राफर संघटनेच्यावतीने जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त मुंबईच्या गणेशोत्सवावर आधारित भरवलेल्या छायाचित्रांच्या प्रदर्शन आणि स्पर्धेत दैनिक ‘सामना’चे छायाचित्रकार सचिन वैद्य यांनी दुसरे पारितोषिक पटकावले आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार प्रशांत गोडबोले, पंढरपूर देवस्थानचे छायाचित्रकार राहुल गोडसे, सुवर्ण अलंकार घडवणारे नाना वेदक, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या उपस्थितीत वैद्य यांना हा पुरस्कार देण्यात आला. पहिले पारितोषिक यश चोपडेकर तर तृतीय पारितोषिक इमॅन्युल कारभारी यांनी पटकावले.

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना दिमाखदार विद्युत रोषणाई, उंच आकर्षक मूर्ती, भाविकांची गर्दी, पाद्यपूजन ते आगमन आणि आगमन ते विसर्जन करताना जोश आणि जल्लोष अशा सर्व टप्प्यातून 160 छायाचित्रकारांनी काढलेली बाप्पांची अप्रतिम अशा विविधांगी छायाचित्रांचे प्रदर्शन गिरगाव चौपाटीजवळ, विल्सन कॉलेजसमोर असलेल्या मेकीचेन हॉलमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनातील छायाचित्रांमधून तीन प्रमुख पारितोषिके आणि पाच छायाचित्रकारांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. प्रदर्शन 20 ऑगस्टपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाहता येणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी आणि माजी दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी केले आहे. या प्रदर्शनात स्पर्धेबरोबरच सुलेखन, मूर्ती प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.