खिचडी घोटाळय़ामागे मिंधे गटाचा नेता म्हशीलकर, गुन्हा दाखल असून कारवाई नाही

कोरोना काळात पालिकेने केलेल्या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याचे सांगत शिवसेना सचिव  सूरज चव्हाण यांना ‘ईडी’ने अटक केली असताना ‘मिंधे’ गटाचा नेता संजय म्हशीलकर यांनीच खिचडी घोटाळा केल्याचे ‘माहिती अधिकारात’ समोर आले आहे. म्हशीलकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल असताना पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेला नाहक त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचे बोलले जात असून ही बाब समोर आल्याने ‘मिंधे आणि भाजप चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

मुंबईत मार्च 2022मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 24 मार्चला पेंद्र सरकारकडून अचानक ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले. सर्व वाहतूक व्यवस्था, कामधंदे बंद पडल्याने मुंबईत कामानिमित्त राहणारे लाखो मजूर, कामगार अडकून पडले. या काळात पालिकेकडून कामगार, मजूर आणि गरजूंसाठी दिवसातून दोन वेळा खिचडीचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे हातावर पोट असलेल्या कामगारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र या खिचडी वाटपात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव सूरज चव्हाण यांनी घोटाळा केल्याचे सांगत त्यांची वारंवार चौकशी करण्यात आली. ‘ईडी’ने काल त्यांना अटकही केली आहे. मात्र या तथाकथित खिचडी घोटाळ्यात मिंधे गटाच्याच नेत्याचा हात असल्याचे समोर आल्याने ‘मिंध्यां’विरोधात सर्वसामान्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

कोरोना काळातील तथाकथीत खिचडी घोटाळा प्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात येत होती. यानंतर हा तपास ‘ईडी’कडे सोपवण्यात आला. ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली.

हा तपास मुंबई पोलिसांकडे असताना पर्ह्स वन मल्टी सर्व्हिसेसविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कंपनीचे मालक संजय म्हशीलकर असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. म्हशीलकरांची दोन मुले प्रीतम आणि प्रांजल हे या कंपनीत भागीदार आहेत.

म्हशीलकरांच्या कंपनीने असा केला घपला

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या म्हशीलकरांच्या पर्ह्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीचा मूळ व्यवसाय विटा आणि वाळू विक्रीचा आहे. ही कंपनी सुरक्षारक्षक पुरवण्याचेही काम करते. मात्र या कंपनीकडे खिचडी पुरवठा पंत्राटासाठी आवश्यक असणारा अन्न, औषध आणि आरोग्य विभागाचा परवानाही नव्हता. असे असताना या कंपनीने बेकायदेशीरपणे अन्न पदार्थ तयार करणे आणि पुरवण्याचे काम मिळवले. ही कंपनी अन्न पदार्थ तयार करण्याचे कामही करीत नसल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंद केल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे.