‘इंडिया’ला हरवणं अशक्य – संजय राऊत

‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक आज गुरुवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस मुंबईत होत आहे. ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत असून या बैठकीसाठी ‘इंडिया’ आघाडीतील प्रमुख पक्षांचे नेतेही मुंबईत दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर निशाणा साधला.

‘इंडिया’ आघाडीला मिळणारा जनतेचा प्रतिसाद पाहून भाजप आणि त्यांच्यासोबतच्या पक्षांमध्ये घबराट पसरली आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. जशाजशा ‘इंडिया’ आघाडीच्या बैठका वाढत जातील, तशी देशात भीतीपोटी का होऊन महागाई कमी होत जाईल. 2024मध्ये आम्हीच जिंकणार असून ‘इंडिया’ला हरवणे अशक्य आहे, असेही राऊत म्हणाले.

बैठकीसाठी मुंबईत दाखल झालेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधननिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना राखी बांधली. यावर ‘इंडिया’ आघाडीवर टिकाटिप्पणी करणाऱ्यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. ‘इंडिया’ आघाडीचा धाका राखीप्रमाणे मजबूत आहे. आम्ही सर्व देश वाचवण्याच्या, देशभक्तीच्या नात्यात गुंफलेलो असून हे नाते कोणीही तोडू शकणार नाही. आमच्यात काहीही मनभेद, मतभेद आणि कोणत्याही प्रकारचे भेद नाहीत, असेही राऊत म्हणाले.

मुंबईत होणाऱ्या बैठकीबाबतही राऊत यांनी माहिती दिली. बैठकीची तयारी पूर्ण झाली आहे. सायंकाळी बैठकीला सुरुवात होईल आणि ही बैठक उद्यापर्यंत चालेल. त्यानंतर आम्ही देशासमोर अॅक्शन प्लॅन घेऊन येऊ, असेही ते म्हणाले. तसेच आमची ताकद जशी वाढत जाईल ते बघून चीनही सीमारेषेवरून मागे हटेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

दरम्यान, एकीकडे ‘इंडिया’ आघाडीची तर दुसरीकडे महायुतीची आज, उद्या बैठक होणार आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून प्रमुख पक्षाकडून दुर्लक्षित असलेल्या छोट्या घटक पक्षांना महायुतीने 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण दिले आहे. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, त्यांनी वर्षावर बैठक घेऊ द्या किंवा चांद्रयान खाली बोलवून त्यासोबत पुन्हा वर जाऊन बैठक घेऊद्या, ‘इंडिया’ आघाडीचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही. आम्ही एकजुट आहोत आणि राहणार.