रोखठोक – सद्दाम, लादेन आणि निज्जर; कॅनडातील खलिस्तान

कॅनडात शिखांचा आकडा मोठा आहे. तेथील सरकारात चार शीख मंत्री व 17 शीख खासदार आहेत. एवढी संख्या हिंदुस्थानच्या संसदेत नाही. कॅनडा हे खलिस्तानी चळवळीचे आश्रयस्थान बनले, पण हिंदुस्थानात खलिस्तान होणार नाही. खलिस्तानवाद्यांनी कॅनडात खलिस्तानची मागणी करायला हवी.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो जी-20 संमेलनासाठी हिंदुस्थानात आले, पण जाताना खलिस्तानची आग लावून गेले. ती आग अद्यापि विझलेली नाही. शीख समाजाची मनोभूमिका समजून न घेता टाकलेले पाऊल पुन्हा देश पेटवू शकेल. अहमदशहा अब्दाली सुवर्णमंदिरात शिरला होता तेव्हा 25 हजार शीख स्त्री-पुरुषांनी मरण पत्करले. धर्मासाठी बलिदान करणारा मासारखा दुसरा समाज मिळणार नाही. सुवर्णमंदिरात इंदिरा गांधी यांनी सैन्य पाठवले. शेवटी इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांची हत्या झाली. इंदिरा गांधी हत्येचा उत्सव कॅनडातील काही शिखांनी साजरा केला व तेथील सरकार मूक दर्शक बनून राहिले. पंजाब प्रश्नाने ऐंशीच्या दशकात हिंदुस्थानात उद्रेक निर्माण केला. तसे चित्र आज नाही, पण आपल्या देशात बन्यावाईट विषयांचे राजकारण सहज होते. त्यात ‘धर्म’ आला की, राजकारण हे केलेच जाते. शिखांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता पंजाब नसून कॅनडा आहे. कॅनडाच्या भूमीवर आज शिखांचे राजकारण सुरू आहे. धर्म आणि राजकारणाचे हे कॉकटेल जगासाठी घातक आहे.

शीख दंग्यांच्या जखमा

कॅनडातील शिखांचे राजकारण हिंदुस्थानातील शीख समुदायाचे मन विचलित करू शकणार नाही. 1984 च्या शीख दंग्यांच्या जखमा आजही ताज्या आहेत. इंदिरा गांधींनी सैन्याला सुवर्णमंदिरात ‘घुसण्याचा हुकूम दिला होता. या अपमानाचा बदला इंदिराजींच्या शीख अंगरक्षकांनी त्यांना ठार मारून घेतला. शिखांनी इंदिरा गांधींना ठार मारले म्हणून हिंदूंनी इंदिरा गांधींच्या खुनाचा सूड हजारो शिखांना ठार मारून घेतला. श्रीमती इंदिरा गांधींच्या खुन्यांना फाशी दिली म्हणून खलिस्तानी दहशतवाद्यांनी काही निरपराध हिंदूना फाशी देऊन मारले. हे सर्व धर्माच्या आणि स्वतंत्र खलिस्तानच्या नावावर झाले व त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागली.

कॅनडाचे एक राजकारणी मला भेटले. त्यांना मी विचारले, “कॅनडातील काही शिखांना खलिस्तान हवे आहे. व त्यासाठी ते हिंदुस्थानातील शिखांना भडकवीत आहेत. “

“कॅनडातील शिखात एक वर्ग आहे. ते आर्थिकदृष्ट्या प्रबळ आहेत. ते खलिस्तानचे समर्थक आहेत, कॅनडाचे राजकारणी.

“महाशय, त्यांना खलिस्तान हवेच असेल तर त्यांनी हिंदुस्थानकडे पाहू नये. हिंदुस्थानपेक्षा जास्त शीख कॅनडाच्या भूमीवर आहेत. त्यातील खलिस्तानवाद्यांनी कॅनडात स्वतंत्र खलिस्तान मागावे व त्या मागणीसाठी पुढाकार घ्यावा. हिंदुस्थानातून त्यांना कोणी विरोध करणार नाही. हिंदुस्थानी वंशाचे शूर लोक अमेरिका-कॅनडाच्या भूमीवर स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन करत असतील तर ते कौतुकास्पद आहे.” मी म्हणालो.

“तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे.” असे कॅनडाचे ते डिप्लोमॅट यावर म्हणाले.

हिंदुस्थानात आता धर्माच्या आधारावर दुसरे राष्ट्र शक्य नाही. एक पाकिस्तान निर्माण झाले पाकिस्तानातून बांगलादेश झाले. श्रीलंकेतील ‘तामिळी’ लोकांनी तेथे स्वतंत्र राष्ट्रासाठी हिंसक आंदोलन सुरू केले. तेव्हा त्यांचा बीमोड करण्यासाठी जाफनात हिंदुस्थानला सैन्य पाठवावे लागले. तामीळ राष्ट्राची मागणी करणारा प्रभाकरन शेवटी मारला गेला, पण तोपर्यंत हिंदुस्थानात व श्रीलंकेत रक्तपाताचा कहर झाला होता. राजीव गांधींचा बळी त्यात गेला. नवे राष्ट्र सहज उदयास येत नाही. पुन्हा त्यामागे विचार आणि भूमिका नसेल तर त्या भूमीवर रक्ताचे पाट वाहतात.

‘जस्टिनसिंग’ ट्रुडो

कॅनडाच्या सरकारमध्ये चार शीख मंत्री व संसदेत 17 शीख खासदार आहेत. त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांना गमतीने ‘जस्टिनसिंग’ टूडो ‘ असे म्हटले जाते. टुडो यांना खलिस्तानची मागणीकरणान्या शीख गटाविषयी सहानुभूती आहे हे आता लपून राहिलेले नाही. कॅनडात आज साधारण आठ लाख शीख आहेत. कॅनडात हिंदुस्थानी वंशाचे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यात पंजाबच्या शिखांची सत्ताधारी आहेत! संख्या जास्त आहे. कॅनडातील कोणत्याही सरकार स्थापनेसाठी शीख त्यांच्या सोबत असणे हे आता महत्त्वाचे झाले आहे. 126 वर्षापूर्वी कॅनडात एकही शीख नव्हता. आज कॅनडात शिखांचे राजकीय, आर्थिक प्रभुत्व वाढले आहे. 1897 मध्ये पहिली शीख व्यक्ती कॅनडात गेली. 1897 मध्ये ब्रिटिश हिंदुस्थानी सैन्यातील मेजर केसर सिंग कॅनडामध्ये स्थायिक झाले तेव्हा शिखांना ‘कॅनडाची वाट सापडली व शीख तेथे मोठ्या प्रमाणावर जाऊ लागले. 1980 पर्यंत कॅनडातील शिखांची लोकसंख्या 35 हजारांपर्यंत गेली ती आता आठ लाखांवर पोहोचली. 2021 सालच्या कॅनडाच्या जनगणनेनुसार तेथे साधारण 2.5 टक्के शीख नागरिक आहेत. हिंदुस्थानी जनगणनेतही शिखांचे इतके प्रमाण नसावे, पाकिस्तान किवा अन्य कोणत्याही इस्लामिक राष्ट्रापेक्षा हिंदुस्थानात मुसलमान लोकसंख्या जास्त आहे. तसेच कॅनडातील शिखांच्या बाबतीत म्हणता येईल. पंजाबातील तरुणांसाठी ‘कॅनडा’ हा स्वर्ग बनला आहे व पंजाबातील विद्यार्थी शिक्षणासाठी कॅनडाचा मार्ग धरतात व वर्षाला फक्त पंजाबी विद्यार्थ्याकडून कॅनडात 68 हजार कोटींची गुंतवणूक ‘फी’च्या रूपाने केली जाते. वर्षाला साधारण 2.5 लाख विद्यार्थी कॅनडाकडे शैक्षणिक व्हिसासाठी अर्ज करतात. कॅनडा आणि शिखांचे हे असे नाजूक नाते आहे. प्रश्न इतकाच आहे की, शिखांतील एका गटास त्यांच्या धर्माचे स्वतंत्र राष्ट्र हवे असेल तर त्यासाठी ‘कॅनडा’ची भूमीच योग्य आहे. तेथे शीख बहुसंख्य व सत्ताधारी आहेत.

संरक्षणाचा अधिकार

कॅनडा क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे त्यातला एक प्रांत शिखा’च्या नावाने करून द्यायला काहीच हरकत नाही. परदेशातील शिखांचा एक ‘गट’ हिंदुस्थानातील शीख फुटीरतावाद्यांना मोठे अर्थसहाय्य करीत आला आहे. हिंदुस्थानातील तपास यंत्रणांना हव्या असलेल्या अनेक ‘फुटीरतावाद्यांना कॅनडात सहज आश्रम मिळतो. पाकिस्तानात बसून दाऊद, शकील, मेमन हिंदुस्थानात कारवाया घडवतात तसेच कृत्य वेगळ्या बाबतीत कॅनडाच्या भूमीवर होते व त्यातलाच एक मोस्ट वॉण्टेड ‘निज्जर’ याची कॅनडात हत्या झाली. ही हत्या हिंदुस्थानने घडवून आणली असा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आरोप केला व दोन देशांत तणाव निर्माण झाला. हिंदुस्थानच्या यंत्रणांनी निज्जरची हत्या केली की नाही, हा आरोप अद्यापि सिद्ध व्हायचा आहे, पण देशाच्या संरक्षणासाठी अशी कारवाई करण्याचा अधिकार हिंदुस्थानसारख्या देशाला आहे. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारले, त्याचे कौतुक कॅनडासह जगातील प्रमुख राष्ट्रांनी केले होते. मानव कल्याणाच्या नावाखाली अमेरिकेच्या फौजा इराकमध्ये घुसल्या व त्यांनी लोकनियुक्त अध्यक्ष सद्दाम हुसेनला फासावर लटकवले. अफगाणिस्तानमध्ये फौजा घुसविण्यात रशिया व अमेरिका पुढे होती. त्यांच्या देशास धोका निर्माण झाला होता म्हणून आणि उदात्त मानवी हेतूंची तुतारी वाजवत या राष्ट्रांनी हे कृत्य केले होते. त्यामुळे निज्जर प्रकरणात हिंदुस्थानला दोष का देता ?

तणावपूर्ण संबंध

कॅनडा आणि हिंदुस्थानचे संबंध आज तणावाचे बनले आहेत. जस्टिन ट्रुडो यांची पंतप्रधान म्हणून कॅनडातील लोकप्रियता घटत आहे. टुडोंकडे बहुमत नाही त्यामुळे जगमितसिंग यांच्या पक्षाच्या पाठिव्यावर त्यांचे सरकार उभे आहे. शिखांचा हा पक्ष छुपा खलिस्तान समर्थक आहे. पंजाबप्रमाणे व्हँकुव्हर टोरोंटो, कॅलगरीसह संपूर्ण कॅनडात गुरुद्वारांचे मोठे जाळे आहे. सर्वच राजकीय पक्षांना मते मागण्यासाठी या गुरुद्वारांत जावे लागते. हिंदुस्थानातील राजकारणी चर्च, मंदिर, मशिदीचे राजकारण करतात, पण कॅनडात ‘गुरुद्वार’ हे राजकारणात महत्त्वाचे ठरते. कॅनडात गुरुद्वारांचे स्वतंत्र राजकारण आहे. पण त्यांचे ते धार्मिक राजकारण त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवर आणू नये. कॅनडाच्या संसदेत एखाद्या खासदाराने उभे रहावे व कॅनडात लोकसंख्येच्या आधारावर शिखांना ‘खलिस्तान’ हवे आहे, अशी मागणी करावी, कॅनडाचे खरे रूप तेव्हा पाहता येईल

Twitter – @rautsanjay61
Email –  [email protected]