पंतप्रधानांविषयी अपशब्द वापरणे चूकच, मात्र….! संजय राऊत यांचे भाजपला चिमटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्याने मालदीवविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जर हिंदुस्थानसारख्या महान देशाच्या पंतप्रधानाबद्दल दुसऱ्या देशाचे मंत्री अपशब्द वापरत असतील तर ते या देशाच्या लोकांना अजिबात मान्य नाही असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राजकीयदृष्ट्या आम्ही मोदींवर टीका करत असलो तरी ते या महान देशाचे पंतप्रधान आहे. महान देशाच्या पंतप्रधानाविषयी दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी चुकीचा शब्द वापरणे हे या देशाच्या लोकांना अजिबात मान्य नाही असे संजय राऊत यांनी म्हटले.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी म्हटले की, “देशाच्या पंतप्रधानांसंदर्भात कोणी अपशब्द काढत असतील तर त्याचा धिक्कार व्हायला हवा, आम्हीही त्यात सामील आहोत. राजकीयदृष्ट्या आम्ही मोदींवर टीका करत असलो तरी ते या महान देशाचे पंतप्रधान आहे. महान देशाच्या पंतप्रधानाविषयी दुसऱ्या देशाच्या मंत्र्यांनी चुकीचा शब्द वापरणे हे या देशाच्या लोकांना अजिबात मान्य नाही. मात्र याचा वापर राजकारणासाठी करून भाजपने जे दिवे लावायला सुरुवात केली आहे यावरून आम्हाला असं वाटतं की लक्षद्वीपची एकमेव जागा जिंकण्यासाठी हे पूर्वनियोजित तर नव्हतं ना. तरीही आम्ही धिक्कार करतो. “

दिल्लीमध्ये आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक बैठक होत आहे. याबाबत माहिती देताना राऊत यांनी म्हटले की आजच्या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीनही पक्षांचे नेते असतील. आम्ही एकत्रितरित्या एक आराखडा बनविण्याचा प्रयत्न करू मात्र काही मतभेद झाले तर शेवटच्या टप्प्यात तीनही पक्षांचे प्रमुख नेते एकत्र बसून तोडगा काढतील. बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक, हरयाणा, तमिळनाडू ही राज्ये 2024 चे देशाचे भवितव्य ठरवतील. यामुळे महाराष्ट्रात आम्हाला जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलावी लागेल असे राऊत यांनी म्हटले. शिवसेना 23 जागांवर लढेल असे म्हणतानाच राऊत यांनी दृढ विश्वास व्यक्त केला की महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी खांद्याला खांदा लावून निवडणूक लढवतील.