अमित शहा ‘मातोश्री’च्या पायऱ्या चढून कशाला आले होते? संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना परखड सवाल

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा झालीच नाही असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते खोटं बोलत आहेत. मग अमित शहा त्यावेळी मातोश्रीच्या पायऱ्या चढून कशाला आले होते? असा परखड सवाल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, अमित शहा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा होत असताना शिंदे तिथे नव्हते. तेव्हा ते पक्षाचे नेतेही नव्हते. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना पक्षाचा नेता केले. अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांच्या खोलीत चर्चा झाली. अमित शहांनी सांगावे की ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बाळासाहेबांच्या खोलीत गेले नाही. तिथे भाजपचे इतरही नेते होते. पण हा माणूस पूर्णपणे भाजपचा गुलाम, नोकर झाला असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, म्हणून अशा प्रकारची बेताल वक्तव्य करत आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

2014 ला युती तोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीवेळी भाजपची फाटली होती. आपण जिंकू शकत नाही हे त्यांना कळून चुकले. त्यामुळे तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष अमित शहा स्वत: मातोश्रीवर कशासाठी आले होते याचे उत्तर देतील. यांना मोदी-शहांसोबत राहून खोटं बोलण्याचे व्यसन लागले आहे. अमित शहा आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या खोलीत गेले, त्यांच्यात चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्लू सीमध्ये गेल्यावर फडणवीस 50-50 पॉवर शेअरींगबाबत बोलले. त्यांचे विधान रेकॉर्डवर असून यांच्या कानात बूच बसले आहे का? असा सवाल करत यांना महाराष्ट्रच धडा शिकवेल, असेही राऊत म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

ते पुढे म्हणाले की, आम्हाला तडजोड करायची असती तर आम्ही कधीच केली असती. पण आम्ही पळून जाणारे, पळपुटे, डरपोक नाहीत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाही. डुप्लिकेट शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा, भाजप नेत्यांच्या अभिनंदनाचा ठराव झाला. का ही लाचारी? बाळासाहेब ठाकरे असते तर यांचा कडेलोट केला असता, असा घणाघातही राऊत यांनी केला.

दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, शिवसेना, राष्ट्रवादीचीही काही लोकं सोडून गेली. त्याने काहीही फरक पडत नाही. जे लोकं डरपोक असतात, पक्षाच्या नावाखाली पैसा कमावला ते ईडीच्या भीतीने जात आहेत. हे बेईमान लोकं आहेत. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पराभूत होऊ शकत नव्हती. पण कमलनाथ सारख्या लोकांनी निवडणुकीत घोळ घातला. पण ते काँग्रेस सोडतील असे वाटत नाही, असेही राऊत म्हणाले.