सत्याचा शोध – शास्त्रज्ञांचीही घागर रिकामी!

>>चंद्रसेन टिळेकर

शास्त्रज्ञांसह तुम्हा आम्हावर बालपणी जे संस्कार केले जातात की, जे अधिकतर धार्मिक असतात, ते आयुष्यभर आपली साथ सोडत नाहीत आणि याला शास्त्रज्ञही अपवाद ठरत नाहीत. या संस्कारामुळे आमचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत उत्तम काम करतात. मात्र बाहेरच्या सार्वजनिक जीवनात ते सर्वसामान्यांसारखेच वागतात.

दिनांक 22 सप्टेंबर 1995. सकाळचे दहा वाजतात न वाजतात तोच दिल्ली आणि उत्तर हिंदुस्थानातील राज्यातून एक अकल्पित अशी बातमी मुंबईनगरीत येऊन धडकली. ती म्हणजे गणेश, गणपती दूध पिऊ लागला आहे. लोकांनी टीव्ही लावले. बहुतेक चॅनेल्सवर छोट्या मोठ्या देवळांसमोर प्रचंड रांगा लागलेल्या दिसत होत्या. प्रत्येकाच्या हातात दुधाने भरलेली छोटी मोठी भांडी होती. जसजशी ही बातमी वणव्यासारखी पसरायला लागली तसतसे हातात जे मिळेल ते भांडे घेऊन लोक रस्त्यावर उतरले होते आणि दूध विकत घेऊन जवळपासच्या मंदिराकडे धावत सुटले होते. हां हां म्हणता दुधाचा भाव शंभर रुपयांच्या वर गेला. अनेक कचेऱया-कारखान्यातून चक्क सुट्टी घेऊन कर्मचारी गणपतीला दूध पाजण्यासाठी बाहेर पडले. नंतर लक्षात आलं की, हे केवळ मुंबईमध्ये घडत नव्हतं, तर संपूर्ण देशभर भक्तीचा महापूर आला होता. हिंदुस्थानी कसे पिसाटले होते त्याचे दर्शन उपग्रहाद्वारे सगळ्या जगाला झाले.

ज्यांची विवेकबुद्धी जागेवर होती त्यांनी सर्वसामान्य जनांना चमच्यातील दूध विज्ञानातील surface tension म्हणजेच पृष्ठीय ताणामुळे मूर्तीत शोषले जाते, देव दूध पीत नाही हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण कुणाच्याही पचनी पडत नव्हतं. देवावर शंका घेणं पटत नव्हतं. ज्या दगडाच्या मूर्ती होत्या त्यांच्या पृष्ठभागावरून दूध ओघळत जाऊन मूर्तीच्या पायाशी जमा झालं होतं. मूर्तीने खरोखर दूध प्राशन केलं असतं तर ते खाली सांडलं नसतं, पण ते कोणी पाहायला तयारच नव्हतं. भक्तीची नशा बुद्धिमांद्य आणते ते हे असं.

या सर्व प्रकारावर कळस चढवला तो आमच्या शास्त्रज्ञांनी. यासंदर्भात सत्य काय आहे ते सर्वसामान्यांना कळावं म्हणून पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघातील मॅजेस्टिक गप्पांत ‘गणरायाचे दुग्धप्राशन’ हा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात तीन नामांकित शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आलं होतं. एक होते कुलाब्यातील मूलभूत संशोधन संस्थेचे ज्येष्ठ संशोधक, दुसरे होते तीस वर्षं एका महाविद्यालयात भौतिकशास्त्र शिकवणारे उपप्राचार्य आणि तिसरे होते भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक म्हणून उच्च पदावर असलेले व अभिनेते डॉ. हेमू अधिकारी. पटांगण गच्च भरलं होतं. आश्चर्य म्हणजे डॉ. हेमू अधिकारी वगळता त्या दोन शास्त्रज्ञांनी चक्क ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली. इतकंच काय, पण केव्हातरी ईश्वरालाही आपल्या अस्तित्वाची प्रचीती मानवाला द्यावी अशी उत्कट इच्छा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यातूनच मग असे चमत्कार होतात. साक्षात्कार घडतात, अशी ग्वाहीही दिली. श्रोत्यांनी शास्त्रज्ञांच्या तोंडून देवाच्या अस्तित्वाची गॅरंटी मिळताच आनंदाने टाळ्यांचा गजर केला. डॉ. हेमू अधिकारी यांनी मात्र त्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांशी सहमत न होता त्यांच्या विचारांचं खंडन करण्याचा प्रयत्न केला, पण श्रोत्यांमधून त्यांच्याविरुद्धच निषेधात्मक सूर ऐकू येऊ लागले. मंडळी जणू दैवी स्वप्नरंजनात गेली होती. हे सगळे घाऊक संमोहन पाहून माझी तर वाचाच गेली होती. परिसंवाद संपत आला तसे श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले संस्कृतचे प्राध्यापक दातार तडक माझ्याकडे आले आणि म्हणाले, “टिळेकर, प्रवचन कीर्तन ऐकत बसल्यासारखे काय बसलात?”
“मग काय करू?”
“अहो, मी संस्कृतचा प्राध्यापक आहे, पण तुम्ही सायन्सवाले आहात. तुम्ही त्या वक्त्यांना विचारा ना की, विज्ञानाच्या कोणत्या नियमात दगडाच्या, लाकडाच्या मूर्तीचं हे असं दूध पिणं बसते ते.”
“अहो, पण लोक पहा ना कशी सुखावलीत ती. आपण खुसपट काढल्याने त्यांच्या आनंदावर विरजण पडलेलं त्यांना आवडणार नाही.”
पण दातार सर हट्टालाच पेटले होते. त्यांनी चक्क मला ओढतच स्टेजजवळ नेलं. परिसंवाद संपला होता. वत्ते खाली उतरण्याच्या तयारीत असताना दातार सर त्यांना मोठ्याने म्हणाले, “तुम्ही कोणी खाली उतरायचं नाही. तुम्ही आता जे सांगितलंत ते कोणत्या तर्कशास्त्रात बसतं हो?”

मग मीही त्यांना तारस्वरात विचारलं, “आणि विज्ञानाच्या कोणत्या नियमात बसतं तेही सांगा.” तसं ते उपप्राचार्य मला म्हणाले, “मी गेली 30 वर्षे विद्यार्थ्यांना फिजिक्स शिकवलंय आणि शिकवतोय आणि तुम्ही मला विचारताय?”

“याचा अर्थ तुम्ही आमच्या दोन पिढ्या बरबाद केल्यात.” मी काहीशा त्वेषानेच म्हणालो. एव्हाना आमच्या भोवती आणखीही काही माणसं जमा झाली. त्यांनी या खडाजंगीत आमच्या वतीने भाग घ्यायला सुरुवात केली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्यावरून ते चांगले व्यासंगी होते हे जाणवलं. काहींनी डॉ. जयंत नारळीकरांचे संदर्भ दिले, तर काहींनी सरफेस टेन्शनमुळे हे कसं घडू शकतं हे त्या दिग्गज शास्त्रज्ञांना ऐकवलं. डॉ. हेमू अधिकारी ही सगळी गंमत पाहत होते. त्यांच्या चेहऱयावर समाधानाची भावना होती. वक्त्यांना स्टेजच्या खाली उतरणं दुरापास्त होऊन बसलं होतं. शेवटी लोकमान्य सेवा संघाच्या कार्यकर्त्या स्वाती खंडकर पुढे आल्या आणि त्यांनी वक्त्यांना स्टेजच्या खाली उतरण्यासाठी मदत केली.

थोडक्यात सांगायचं तर आमच्या ‘शास्त्रज्ञांचीही घागर’ रिकामीच निघाली. आता कुणालाही असा प्रश्न पडेल की, भाबड्या भक्तांचं एकवेळ आपण सोडून देऊ, पण या शास्त्रज्ञ मंडळींचं काय? ते धादांत आहे, जे अशास्त्राrय आहे, ते कसं बोलू शकतात? त्यांनी खरं तर सर्वसामान्यांचं प्रबोधन केलं पाहिजे, परंतु त्यांची तर ‘ज्ञानाची गंगा’ उलटीच वाहतेय. कुणीही संभ्रमात पडावं अशीच ही घटना होती, परंतु शांतपणे विचार केल्यावर आपल्या लक्षात येतं की, शास्त्रज्ञांसह तुम्हा आम्हावर बालपणी जे संस्कार केले जातात की, जे अधिकतर धार्मिक असतात, ते आयुष्यभर आपली साथ सोडत नाहीत आणि याला शास्त्रज्ञही अपवाद ठरत नाहीत. या संस्कारामुळे आमचे वैज्ञानिक प्रयोगशाळेत उत्तम काम करतात. मात्र बाहेरच्या सार्वजनिक जीवनात ते सर्वसामान्यांसारखेच वागतात. म्हणूनच मग विज्ञानाचे शिक्षण घेतलेला तंत्रज्ञ महासंगणकाची निर्मिती करतो, पण प्लॅंचेटने आत्मा येतो यावर विश्वास ठेवतो. चांद्रयान सोडणारे ISRO चे अंतराळ वैज्ञानिक (space scientist) ते यान चंद्रावर अलगद उतरावं म्हणून जवळच्या मंदिरात जाऊन देवाची करुणा भाकतात.

परिसंवादात झालेल्या वादविवादातून माझ्या एक गोष्टी लक्षात आली की, सर्वसामान्यांचाही व्यासंग असू शकतो, पण त्यांना बोलण्यासाठी कुठे व्यासपीठ उपलब्ध नाही. असं व्यासपीठ आपण का निर्माण करू नये या विचाराने मी पछाडला गेलो आणि त्या तळमळीतूनच मुंबईतलं पहिलं मुक्त व्यासपीठ पार्ल्यातल्या सावरकर उद्यानात आम्ही पतिपत्नीने 9 मार्च 1996 रोजी उभारलं आणि त्याचं नामकरण केलं ‘आचार्य अत्रे कट्टा’! या कट्ट्याने मुंबईत कट्टा संस्कृती रुजवली. वाईटातून चांगलं निर्माण होतं ते हे असं. या कट्ट्याने जो इतिहास घडवला त्याबद्दल बोलू पुढच्या वेळी !

[email protected]

(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)