सर्व्हरडाऊनमुळे शासकीय कामांवर परिणाम

गेल्या 15 दिवसांपासून सर्व्हरडाऊन झाल्याने तहसीलदारांसह अनेक शासकीय कार्यालयांतील कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले, तसेच रुग्णांना वैद्यकीय कागदपत्रे जमा करताना ऑनलाइनचा मोठा फटका बसत आहे. अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत, तर दुसरीकडे हेलपाटे मारूनही दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

मार्च एण्डमुळे सर्वच शासकीय कार्यालये व्यस्त असल्याचे दिसून आले. सर्व यंत्रणा ऑनलाइन असल्याने कामाचा वाढता आवाका पाहता, सर्वत्र सर्व्हर डाऊन झाल्याचे चित्र गेल्या 20-25 दिवसांपासून दिसून येत आहे. उपनिबंधक कार्यालयातील सर्व्हरडाऊनचा तिढा सुटला असला, तरी तहसीलदार कार्यालयातील सर्व्हर मात्र गेल्या 15 दिवसांपासून डाऊनच असल्याचे चित्र आहे. स्कॉलरशिपसह अन्य शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांना, तर आरोग्य योजनेच्या कामासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनाही सातत्याने हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र आहे. ई-सेवा केंद्रातून काम पुढे जात नाही आणि गेले तर तहसीलदार कार्यालयातील टेबलवर काम पुढे जात नाही. कर्मचारीही सर्व्हरडाऊनपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे.

गेल्या 15 दिवसांपासून सर्व्हरडाऊनमुळे विद्यार्थी, तसेच नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असतानाही जिल्हा प्रशासनाकडून मात्र याबाबत गांभीर्याने हालचाली होताना दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या कामानिमित्त अधिकारी व्यस्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्या अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.