ज्यांची जबाबदारी त्यांनी घ्यावी! शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर नाव न घेता हल्लाबोल

जालनात मराठा मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेचे तीव्र पडसाद छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी उमटले. त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या ठिकाणी आज भेट दिली आणि जखमी आंदोलकांची विचारपूस केली. आंदोलनाची बदनामी होऊ देऊ नका असं आवाहन करताना शरद पवार यांनी ज्याची जबाबदारी असते त्यांनीच ती घ्यायची असते, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता केला.

जालना येथील पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष जयंत सावला, राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष साईट इन्स्पेक्शन करून एकंदर स्थिती काय आहे, याची माहिती आम्हाला कळवली. आणि राजेश यांचा आग्रह असा होता की जो घडलेला प्रकार आहे, तो अतिशय गंभीर आहे. आणि त्याची दखल आणि संकटात असलेल्या लोकांना दिलासा दिला नाही तर हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता सीमित राहणार नाही. कदाचित पसरण्याची शक्यता आहे. म्हणून मी आणि आमच्या अध्यक्षांनी या ठिकाणी लवकरात लवकर यावं, असा आग्रह राजेश यांनी केल्यानंतर आम्ही दोघांनी काल रात्री ठरवलं. आज इथे आल्यानंतर जालना रुग्णालयात भेट दिली आणि जखमींची भेट घेतली. बळाचा वापर करताना त्यांनी लहान मुलं बघितली नाहीत, स्त्रिया बघितल्या नाहीत, वडिलधारे लोक बघितले नाहीत. हवा तसा बळाचा वापर त्यांनी केला. त्या जखमींशी चर्चा केल्यानंतर जवळपास सगळ्यांनी असं सांगितलं की, आमची चर्चा चालू होती. अधिकारी आमच्याशी बोलत होते. त्यातून काही मार्ग निघेल असंही चित्र दिसत होतं. पण, एकदम अचानक मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तिथे बोलवला गेला. सगळं व्यवस्थित सुरू असताना मुंबई किंवा कुठूनतरी सूचना आल्या आणि पोलीस अधिकाऱ्यांचा एकंदरीत दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी बळाचा वापर करून सरळ सरळ लाठीहल्ला सुरू केला. लाठीहल्ला झाल्यानंतर साहजिकच गावातील लोकसुद्धा त्या ठिकाणी जमा झाले. ती संख्या लक्षात घेऊन की काय माहीत नाही पण हवेत गोळीबार केला आणि छोट्या छऱ्यांचा वापर करून गोळीबार केला. काही जखमींच्या शरीरातून हे छर्रे शस्त्रक्रिया करून काढले, ही माहितीही मिळाली. निष्पाप नागरिकांना कोणत्या प्रकारची वागणूक दिली, हा प्रत्यक्ष पाहिलेला हा अनुभव आहे, अशी माहिती पवार यांनी पत्रकारांना दिली.

ते पुढे म्हणाले की, त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष स्थळावर गेलो. तिथे प्रचंड संख्येने तरुण दिसले. आणि जालना तसंच जालन्याच्या बाहेरचे असावेत असं जाणवलं. त्या ठिकाणी मनोज यांच्याशी, ज्यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे, त्यांनी समंजसपणाची भूमिका घेतली. मी त्यांना आग्रह असा केला की तुमच्या प्रश्नासंबंधी आम्हाला काही माहिती आहे. एकतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार होतं, त्यावेळी जयंत पाटील हे महत्त्वाचे मंत्री होते, राजेश टोपेही मंत्रिमंडळात होते. त्या मंत्रिमंडळाने हे आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यसरकार बदललं, नवीन सरकार आलं ते भाजपचं होतं. त्याप्रकारात काय केलं, कसं लक्ष दिलं याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण तो इश्यू अद्याप प्रलंबित आहे. मनोज म्हणाले की, पूर्वीच्या सरकारनी काही पावलं टाकली, नंतर काही कोर्टाचे निकाल लागले. आम्हाला यातून मार्ग हवाय. आम्हाला दुसरं काही माहीत नाही. जोवर तो मार्ग निघत नाही, तोवर आंदोलन सुरू राहील. मी त्यांना सांगितलं की या आंदोलनाविषयी समाजात आस्था आहे. आणि आस्था असलेलं आंदोलन हे कधीही हाताबाहेर जाऊ देऊ नये. म्हणून आंदोलन शांततेने सुरू ठेवा. राज्य सरकारचं आणि तुमचं काही बोलणं झालं, असं ऐकण्यात येतंय. त्यात जर समाधान होत असेल तर आंदोलन योग्य वेळी थांबवण्याचा विचार तुम्ही करा आणि दुसऱ्या बाजूने असे प्रकार ऐकायला, पाहायला, वाचायला मिळाले की काही ठिकाणी कुठे ट्रक पेटवले, कुठे गाडीला आग लावली. अशा घटनांमुळे आंदोलनाची, आंदोलकांची यामुळे बदनामी होते. त्यामुळे हे शांततेनेच केलं पाहिजे. त्यामुळे कायदा हातात घेण्याचं काम हे कुणी करू नये, असं आवाहन आम्ही केल्याची माहितीही शरद पवार यांनी दिली.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार कायदा हातात घ्यायचं काम त्यांनी केलं नाही. चर्चा सुरू असताना, चर्चा योग्य मार्गावर होतेय असं दिसत असताना, ज्यावेळी एकदम मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी आले आणि स्त्री पुरुष न बघता सरसकट लाठीहल्ला करण्यात आला. त्यामुळे पोलीस दलाचा वापर करण्याचा निर्णय ज्याने कुणी घेतला ही त्याची जबाबदारी आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या मागणीवरील प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, मी कुणाच्याही राजीनाम्याची मागणी केलेली नाही. पण, ‘मुख्यमंत्र्यांनी आज ज्या पद्धतीने सुतोवाच केला, त्यात त्यांनी एक समजंसपणाची किंवा तत्सम भूमिका घेतली होती. मात्र, आज एवढा मोठा प्रकार होतो, ज्याचे पडसाद राज्याच्या ठिकठिकाणी होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला ज्याची जबाबदारी असते त्यांनी घ्यायची असते, ही साधी गोष्ट आहे.’ असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.