शिरीषायन – कहीं रोने से तकदीरे बदलती है?

>> शिरीष कणेकर

देव आनंदच्या खार येथील ‘नवकेतन’च्या ऑफिसात आम्ही दोन-तीन पत्रकार बसलो होतो. सोबत फोटोग्राफर होशी जाल होता. मस्त गप्पा रंगल्या होत्या. एकाएकी कॅमेऱयामागून होशीनं देवला विचारले, ‘दिलीप कुमारसारखं टॅलेंट आपल्याकडेही हवं होतं असं तुला वाटत नाही का?’
मी हादरलो. जणू खोलीत बॉम्बस्फोट झाला होता.
देव स्प्रिंगसारखा कोचवरून उडाला. त्याच्या चेहऱयावरचे गोड, हसरे भाव क्षणार्धात लुप्त झाले होते.
‘आय अॅम अॅज टॅलेंटेड अॅज एनीबडी एल्स इन धिस कंट्री,’ देव फाटलेल्या आवाजात चित्कारला.
होशीनं असं का विचारलं होतं? या प्रश्नाचं प्रयोजन काय होतं? देव आनंदच्या अभिनयाविषयी तुमचं काहीही मत असेल. आमचंही होतंच की. पण म्हणून लाखोंच्या हृदयावर राज्य करणाऱया त्या महामानवाचा तुम्ही तोंडावर असा घोर अपमान कराल?
दोन-पाच मिनिटांत आमची मीटिंग आटोपली. देव आनंदनं स्वत:ला सावरलं होतं, पण त्याचा देखणा चेहरा अजूनही पिळवटलेलाच होता. ‘बावाजी’ होशी जाल काही न घडल्यागत आमच्याबरोबर बाहेर पडला.
परवा तीस-चाळीस वर्षांनी मला होशीची आठवण आली. मी त्याचा फोन फिरवला व त्याचा ‘हॅलो ’ येताच म्हणालो, ‘आय अॅम अॅज टॅलेंटेड अॅज एनीबडी एल्स इन धिस कंट्री.’
‘शिरीष’ होशी ओरडला. म्हणजे ते मीच बोललो होतो असं त्याला वाटतंय की काय?
‡ ‡ ‡
संगीतकार ओ. पी. नय्यरचा पेडर रोडवर एक ज्यादा आलिशान फ्लॅट होता. (तो बायकोमुलांसह चर्चगेटला राहायचा). तिथं तो काय करायचा कोण जाणे. एकदा मला तो तिथं घेऊन गेला. त्याच्याकडचे नाजूक कलाकुसर केलेले सुंदर ग्लास पाहून मी प्रभावित झालो.
‘त्यात कौतुक करण्यासारखं काय आहे?’ ओ. पी. म्हणाला, ‘तेव्हा माझ्याकडे पैसे होते म्हणून मी ते घेतले, बाकी काय!’
ओ.पी.नं पेटी काढली व तिच्यावर सूर धरत तो म्हणाला, ‘मी मानतो की आशानं माझ्या गाण्याचं सोनं केलं. माझ्या चालींना चार चाँद लावले. फिर भी – फिर भी ये है इस गाने में?’
ओ. पी. त्याच्या भसाडय़ा आवाजात गाऊ लागला, ‘रातें को चोरी चोरी बोले मोरा कंगना.’ तो मध्ये मध्ये थांबत होता व हे आहे आशाच्या गाण्यात असं विचारत होता. त्याच्या आवाजातल्या त्या कथित जागा मला दिसत नव्हत्या, ऐकू येत नव्हत्या, कळत नव्हत्या.
मी ओ. पी.ला थांबवत म्हणालो, ‘ज्या आशानं तुमच्या गाण्यांचं सोनं केलं, तुमच्या चालींना चार चाँद लावले, तिला तुम्ही तेव्हा सांगितले असते तर आत्ता तुम्ही सांगताय त्या जागा घेणे तिच्या घशाला शक्य नव्हते? तुमच्या गळय़ाला जे जमतंय ते आशाच्या गळय़ाला जमलं नसतं?’
काही न बोलता ओ.पी.नं पेटी आत ठेवून दिली.
‡ ‡ ‡
शेवटच्या काही वर्षांत मी लताशी मनसोक्त गप्पा मारल्या. दोन-तीन दिवसांनी तरी आम्ही बोलायचोच. एकदा तिचा फोन घ्यायला मला विलंब लागला.
‘काय हो, कुठे होतात?’
‘या वेळेला मी मालकंसचा रियाज करीत असतो.’
‘पण बागेश्री तुमचा आवडता राग आहे ना?’ लतानं हसू आवरत विचारलं.
‘नाही, भीमपलास.’ मी ठासून म्हणालो, ‘आता चौथं रागाचं नाव घेऊ नका हं. मला तीनच नावं माहित्येयत.’
लता हसत सुटली. लताचा आजार बळावत होता. ती बोलण्यातून त्याची यत्किंचितही जाणीव करून देत नव्हती. डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलात हलवायला सांगितले. त्या सुमारास ती फोनवर म्हणाली, ‘शिरीष, मी बरी होऊन हॉस्पिटलातून घरी आले की तुम्ही माझ्याकडे जेवायला या.’
‘नक्की-नक्की.’ मी म्हणालो. मी तिच्याबरोबर शेवटचा विनोद करतोय याची मला पुसटशीही जाणीव नव्हती. ‘मी येईन जेवायला दीदी, पण तुमच्या हातचं जेवून माणसं जिवंत राहिलीत ना?’
लता क्षीण हसली. आयुष्यभर मला ते क्षीण हसणं आठवणार आहे व माझे डोळे परत परत भरून येणार आहेत. ती ‘उडन खटोला’मध्ये गायली होती.
न रो ऐ दिल, कहीं रोने से तकदीरें बदलती है
कहीं आँसू बहाने से तमन्नाएं निकलती है…
[email protected]