अंधेरीतील शिधावाटप कार्यालयाची दुरुस्ती करा, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाची मागणी

अंधेरी पश्चिम येथील शिधावाटप कार्यालय 25-डची दुरवस्था झाली असून ही इमारत धोकादायक अवस्थेत आहे. हे कार्यालय कोसळले तर कर्मचारी आणि सर्वसामान्यांना गंभीर दुखापत होण्याची भीती आहे. त्यामुळे कार्यालयाची तातडीने दुरुस्ती करून कर्मचारी आणि सर्वसामान्यांना दिलासा द्या, अशी मागणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने विभागीय शिधावाटप नियंत्रकांकडे केली.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने एप्रिलमध्ये विभागीय नियंत्रकांकडे अंधेरीतील शिधावाटप कार्यालयाच्या दुरवस्थेचा मुद्दा निदर्शनाला आणून दिला होता. मात्र त्याला 3-4 महिने उलटले तरीदेखील कोणतेही लेखी उत्तर न आल्याने शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस विजय मालणकर आणि सचिव निखिल सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिधावाटप नियंत्रक कानुराज बगाटे यांची मुंबई कार्यालयात भेट घेऊन याचा जाब विचारला. या वेळी बबन सकपाळ, संजय पावले, विजय पवार, मनोज पोईपकर आदी उपस्थित होते.