सौर संशोधनातील हिंदुस्थानची ही एक मोठी झेप, आदित्य ठाकरे यांनी दिल्या इस्रोला शुभेच्छा

‘हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थे’चे (इस्रो) महत्त्वाकांक्षी सूर्य मिशन ‘आदित्य एल-1’चे शनिवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी PSLV XL रॉकेटद्वारे श्रीहरी कोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरवरून ‘आदित्य एल-1’ला लाँच केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी इस्रोच्या या महत्त्वाकांक्षी मिशनला शुभेच्छा दिल्या आहेत.

”आदित्य एल 1′ ने सूर्याच्या दिशेने यशस्वी प्रक्षेपण केले आहे. सौर संशोधनातील भारताची ही एक मोठी झेप असून या मोहिमेसाठी अविरत झटणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन. ‘आदित्य एल 1’ च्या माध्यमातून सूर्यावरील गूढ जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. ‘आदित्य एल 1’ च्या पुढील वाटचालीसाठी इस्रोला शुभेच्छा”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

‘आदित्य एल-1’ मिशन जवळपास 4 महिन्यांत पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर दूर लँगरांजे पॉइंट-1 म्हणजेच एल-1 पॉइंटपर्यंत पोहोचेल. एल-1 पॉइंटच्या चारही बाजूने फिरून सूर्यावरील उठणाऱ्या तुफानाला समजून घेईल. याशिवाय मॅग्नेटिक फील्ड आणि सोलर विंडसारख्या वस्तूंचा अभ्यास करेल. आदित्य एल-1मध्ये प्रयोगासाठी 7 पेलोड बसवले आहेत. आदित्य एल-1 हे सूर्याच्या अभ्यासासाठीचे हिंदुस्थानचे पहिले मिशन आहे. हिंदुस्थान अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नुकतीच चांद्रयान मोहीम यशस्वी केली आहे. यानंतर लगेच सूर्य मोहीम हाती घेतली आहे