उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गोदावरीची महाआरती; काळाराम मंदिरात प्रभू रामचंद्रांचे दर्शन आणि महापूजा

देवेंद्र भगत / राजेश चुरी / बाबासाहेब गायकवाड

मर्यादापुरुषोत्तम, सत्यवचनी प्रभू रामचंद्र आज अयोध्या नगरीत मोठय़ा थाटात विराजमान झाले असताना प्रभू रामचंद्रांची कर्मभूमी पंचवटी रामकुंड परिसर पवित्र गोदावरीच्या महाआरतीमुळे आज भक्तिरसात न्हाऊन निघाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पवित्र गोदावरीची महाआरती करण्यात आली. यावेळी गोदावरीत भक्तिभावाने शेकडो दिव्यांचे दान करण्यात आल्याने गोदावरीचे पात्र लख्ख दिव्यांनी न्हाऊन निघाले. गोदावरीला सोन्याची झळाळी आली. मंगलमय रामस्तुती गीत, तुतारीचा निनाद, ढोलताशांचा गजर आणि रामनामाचा जयघोष अशा डोळय़ाचे पारणे फेडणाऱया नेत्रदीपक सोहळय़ामुळे रामकुंड पंचवटी परिसरात अक्षरशः अयोध्याच अवतरली. शिवसेनेने आयोजित केलेल्या या सोहळय़ासाठी हजारो रामभक्त उपस्थित होते.

प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येप्रमाणे नाशिकमधील कर्मभूमी पंचवटी रामकुंड परिसरालाही तितकेच महत्त्व आहे. शेकडो वर्षांच्या संस्कृती परंपरेचा वारसा असणारा रामकुंड पंचवटी परिसर प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने या ठिकाणाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून या महाआरती सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेदेखील उपस्थित होते. सोहळय़ाच्या निमित्त्ताने उद्धव ठाकरे यांनी प्रथम काळाराम मंदिरात प्रभूरामचंद्रांचे दर्शन घेत महाआरती केली. यानंतर रामकुंड परिसरात पूजाअर्चा करून गोदावरीची महाआरती करण्यात आली. गणपतीच्या ‘सुखकर्ता दुखहर्ता’ या आरतीसह ‘जयदेवी जयदेवी जय गंगामाई, पावन कर मज सत्वर विश्वाचे आई’ अशी गोदावरीची आरती करण्यात आली. यावेळी ‘प्रभू रामचंद्र की’ जय असा जयघोष आसमंतात दुमदुमला.

या महासोहळय़ाप्रसंगी शिवसेना नेते लीलाधर डाके, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते, आमदार सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते अनंत गीते, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना, युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते, आमदार ऍड. अनिल परब, शिवसेना नेते, खासदार राजन विचारे, उपनेत्या प्रियंका चतुर्वेदी, आमदार अजय चौधरी यांच्यासह नेते, उपनेते, मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना नेते सुनील प्रभू, आमदार सुनील राऊत, संजय पोतनीस, विलास पोतनीस, सुनील शिंदे, सचिन अहिर, ऋतुजा लटके, वैभव नाईक, नितीन देशमुख, उपनेते विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, नितीन बानगुडे पाटील, सुधाकर बडगुजर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, दत्ता दळवी, विभागप्रमुख संतोष शिंदे, आशीष चेंबूरकर, सुरेश पाटील, साईनाथ दुर्गे, सुषमा अंधारे, माजी नगरसेवक अंजली नाईक, प्रविणा मोरस्कर, हर्षला मोरे, माधुरी भोईर, संजना घाडी, राजू पेडणेकर, बाबा कदम यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शिवजन्मभूमीवरील पवित्र मातीचा कलश राज्यभर देणार
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरील पवित्र मातीचा कलश घेऊन जुन्नरमधील शिवसैनिक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मंगळवारी हॉटेल डेमोक्रॉसीमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन होणार आहे. यावेळी जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱयांकडे या मातीचे कलश सुपूर्द केले जाणार आहेत. ही पवित्र माती राज्यभर अर्पण केली जाणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी दिली.

विधिवत शास्त्रोक्त पूजा-आरती
यावेळी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात गोदावरीची शास्त्रोक्त पूजाअर्चा झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. यामध्ये गणपती, दुर्गामाता आणि गोदावरी मातेची आरती करण्यात आली. यावेळी सौ. रश्मी ठाकरे यांनी रामकुंडात श्रीफळ, दिवा, फुले, नैवेद्य अर्पण केला. पुरोहितांनी गोदावरी आणि प्रभू रामचंद्र यांची प्रार्थना करीत महाराष्ट्रात सुखशांती लाभो, समृद्धी येवो अशी प्रार्थना केली.

देशावरील अरिष्ट दूर होऊ दे!
देशावरील अरिष्ट दूर करून कायमस्वरूपी सुख, समृद्धी नांदावी, असा प्रधान संकल्प शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसह सोडला. रामरायांचा कृपाशीर्वाद राहावा यासाठी ब्रह्मवृंदांनी यावेळी विशेष पूजा केली.

किर्तीमान शिलालेखास अभिवादन
मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा कीर्तिमान शिलालेख आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रथम या शिलालेखास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी
पंचवटी परिसराला आकर्षक रोषणाई करण्यात आली. महाआरती सुरू होताच या ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यातच आरती संपताच शेकडो दिवे रामकुंडात अर्पण करण्यात आले. भाविकांनी मोबाईल टॉर्च सुरू केल्याने परिसर लखलखला.

फक्त राम आणि रामच!
शिवसेनेच्या वतीने प्रभू रामचंद्रांची महाआरती होणार असल्याने संपूर्ण पंचवटी परिसरात भक्तिमय, राममय वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यांवर लक्षवेधक रांगोळय़ा काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी फक्त रामनामाचीच भक्ती होत होती. राज्याच्या कानाकोपऱयातून आलेले भाविक मोठय़ा भक्तीने रामकुंडात दीपदान, पुष्पदान, अन्नदान करीत होते. संपूर्ण रामकुंड परिसर हजारो भक्तांनी फुलून गेले होते. त्यामुळे परिसरात फक्त राम आणि राम असेच मंगलमय वातावरण होते.