शिवसेनेच्या महाअधिवेशनाची जय्यत तयारी

शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी 22 जानेवारी रोजी श्री काळाराम मंदिर आणि श्रीरामपुंड येथे गोदावरी महाआरती करण्यात येणार आहे. तर मंगळवारी, 23 जानेवारी रोजी शिवसेनेचे महाअधिवेशन आणि जाहीर सभा होणार आहे. या भरगच्च कार्यक्रमांची नाशिक शहरात जय्यत तयारी सुरू आहे. पदाधिकाऱयांसह शिवसैनिकांनी या कामात स्वतःला झोकून दिले आहे.

अधिवेशनानिमित्त भगव्या झेंडय़ांनी शहर भगवेमय करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यभरातून अधिवेशनासाठी येणाऱया शिवसैनिक व पदाधिकारी यांच्या स्वागतासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर स्वागत कक्षांची उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. पदाधिकारी व शिवसैनिक जोमाने ही कामे करीत असून, सगळीकडे प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

शिवसेना नेते, आमदार सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, शिवसेना, युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनीही नाशिकमध्ये येवून यापूर्वी आढावा घेतला आहे. तेही नियोजनावर लक्ष ठेवून आहेत. उपनेते बबनराव घोलप, सुनील बागुल, शुभांगी पाटील, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जळगाव संपर्कप्रमुख संजय सावंत, धुळे संपर्कप्रमुख अशोक धात्रक, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, कुणाल दराडे, गणेश धात्रक, आमदार नरेंद्र दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर वसंत गीते, विनायक पांडे, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप हे परिश्रम घेत आहेत. दीपक दातीर, राहुल ताजनपुरे, बाळकृष्ण शिरसाट, बाळासाहेब कोकणे, देवानंद बिरारी, राहुल दराडे, वैभव ठाकरे, शैलेश सूर्यवंशी, देवा जाधव, ऋषी वर्मा, मसूद जिलानी आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक विविध समित्यांची जबाबदारी सांभाळत आहेत.

संजय राऊत आजपासून नाशिकमध्ये

या सर्व सोहळ्यांच्या नियोजनासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत हे शनिवारी, 20 जानेवारी रोजी नाशिकमध्ये येत आहेत. 24 जानेवारीपर्यंत ते नाशिकमध्ये आहेत. त्यांनी स्वतः या संपूर्ण नियोजनावर लक्ष पेंद्रित केले आहे. पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून माहिती घेवून त्यांना आवश्यक त्या सूचना ते देत आहेत.

22 जानेवारी- अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आनंदोत्सव साजरा करणार आहे. 22 जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन होईल. दुपारी 4 वाजता भगूर येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मारकास भेट देऊन ते अभिवादन करणार आहेत. सायंकाळी सहा वाजता पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते महापूजा करतील. सायंकाळी साडेसहा वाजता श्रीरामपुंड येथे गोदावरी महाआरती त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

23 जानेवारी- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनाप्रमुखांना 23 जानेवारी रोजी सकाळी सातपूरच्या हॉटेल डेमोक्रॉसी येथे अभिवादन करण्यात येईल. याच हॉटेलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत राज्यातील पदाधिकाऱयांचे महाशिबीर होणार आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी सहा वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी 1992 साली कारसेवा करणाऱया शिवसैनिकांचा सत्कार केला जाणार आहे. व्यासपीठाशेजारीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचा गोंधळ होणार आहे.