अजूनही पीएम केअर फंडचा हिशोबच दिला नाही; संजय राऊत यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारचे बाळराजे असा उल्लेख करत श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती दिली. तसेच भाजपकडून गेल्या 10 वर्षात चंदा दो, धंदा लो असा गोरखधंदा सुरू असल्याचा हल्लाबोल केला. भ्रष्टाचार नष्ट करू, असे आश्वासन मोदी यांच्याकडून देण्यात आले आहे. मात्र, देशातील भ्रष्टाचारी नेत्यांनी त्यांनी स्वतःच्या पक्षात घेतले आहे, तरीही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

2014 आणि 2019 सालीही भाजपचे जाहीरनामे आपण पाहिले आहेत. या प्रत्येक जाहीरनाम्यात देशातील भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचा समूळ नायनाट करण्याची गॅरंटी नरेंद्र मोदी यांनी 2014 सालापासून दिली आहे. आता जाहीरनाम्यात पुन्हा एकदा गॅरंटी देण्यात आली आहे. ही गॅरंटी देताना गेल्या दीड-दोन वर्षात देशातील सर्व भ्रष्टाचारी नेते मोदी यांनी त्यांच्या पक्षात घेतले आहेत.आता भाजप हा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष बनला आहे. तरीही मोदी सरकारचे भ्रष्टाचार नष्ट करण्याचे तुणतुणे खरेतर ढोंग सुरूच आहे. ते कार्यवाहक पंतप्रधान असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

निवडणूक रोखे घोटाळा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आणि घोटाळा आहे, हे जगाने मान्य केले आहे. सरकारचा दबाव आणि प्रलोभन देत वसूली करण्याची वृत्ती दिसून येते. ठेकेदार, कंत्राटदार, दारुवाले यांना कोट्यवधींची कामे द्यायची आणि त्यांच्याकडून हजारो कोटी रुपयांचे निवडणूक रोखे भाजपच्या खात्यात जमा करायचे. त्यातून निवडणुका लढवायच्या आणि आमदार-खासदार खरेदी करायचे. भाजपने हा गोरखधंदा गेल्या 10 वर्षापासून सुरू केला आहे. कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही. ऑडीट नाही, तसेच कोरोना काळात सुरू केलेल्या पीएम केअर फंडचा हिशोब नाही. कोणी किती पैसे दिले, कसे, कशासाठी दिले, त्यात परदेशी कंपन्या किती, आलेल्या पैशांचा विनियोग कसा सुरू आहे, याची काहीही माहिती नाही. तसेच मोदीदेखील यावर काहीही बोलत नाहीत. तो खासगी ट्रस्ट असून सरकारी दाखवण्यात आले आणि कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्रातही 500 ते 600 कोटींचा म्हणजे त्यांच्यासाठी छोटा असलेला घोटाळा उघडकीस आला आहे. नितीन सातपुते या वरिष्ठ वकिलांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनबाबत धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली. त्यांचे व्यवहार काय आहेत, त्यांची आर्थिक उलाढाला काय आहे अशी विचारणा त्यांनी केली होती. त्यांचे कोट्यवधींचे व्यवहार आहेत. सरकारचे बाळराजे आणि त्यांचे मंडळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात बसून चंदा दो, धंदा लो अशा माध्यमातून कोट्यवधी रुपये जमवत आहे. सातपुते सातत्याने याचा पाठपुरावा करत आहेत. मात्र, धर्मादाय आयुक्त दबावाखाली असल्याने ही माहिती दिली जात नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

आपल्या माहितीप्रमाणे काही वर्षात या फाऊंडेशनच्या खात्यात 40 ते 50 लाखांची उलाढाल झालेली आहे. मात्र, त्यांचा खर्च, जाहिराती या कोही कोट्यवधींमध्ये आहेत. हे पैसे कोठून येतात. हे दानशूर कर्णाचे अवतार कोण आहेत. पैसा कोठून येतो, कोठे जातो, याची माहिती धर्मादाय आयुक्तांकडे नाही. काही लाखांमध्ये उलाढाल असताना कोट्यवधींमध्ये खर्च कसा करण्यात येतो, असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयात बसून कंत्राटदार, ठेकेदार यांच्याकडून पैसे जमवायचे आणि त्यांना कंत्राट द्यायच, अशा माध्यमातून हे पैसे जमवले जात आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.