हिंदुस्थानचा आयर्लंड दौरा; सितांशु कोटक ‘टीम इंडिया’चे प्रभारी प्रशिक्षक

हिंदुस्थानी संघ सध्या वेस्ट इंडीजच्या दौऱयावर टी-20 क्रिकेट मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंड दौऱयावर जाणार आहे. या दौऱयासाठी हिंदुस्थान ‘अ’ संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए)चे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

आयर्लंड दौऱयावर प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियात पुनरागमन करणार असून त्याच्याच नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कारण या मालिकेसाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ‘एनसीए’चे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंड दौऱयावर टीम इंडियासोबत येण्याची अपेक्षा होती. कारण फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांच्यासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखालील नियमित प्रशिक्षक कर्मचाऱयांना आशिया चषक, ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर जागतिक क्रिकेटमधील व्यस्त वेळापत्रकामुळे आयर्लंड दौऱयासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे सौराष्ट्रचे माजी फलंदाज सितांशु कोटक यांच्याकडे टीम इंडियाचे प्रभारी प्रशिक्षकपद सोपविण्यात आले आहे. हिंदुस्थानी संघ 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामने खेळणार आहे