चोरीला गेलेल्या पाच मोटारसायकलसह सहा चोरटे जेरबंद

मोटार सायकल चोरी करणाऱ्या सहा आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत. चोरणारे गणेश जेजुरकर, दिनेश राजेंद्र आहेर( 30, रा. ब्राम्हणगाव ता.कोपरगाव), अजित कैलास जेजुरकर (24,रा.ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) तर विकत घेणारे प्रविण सुका कोळी (32) , प्रमोद झुंबरलाल कोळी (23) , हर्षल राजेंद्र राजपुत (23, तिन्ही – रा. उपपिंड ता. शिवपुर जि.धुळे )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 24 मे रोजी तक्रारदार सागर धनिशराम पंडोरे (रा.ब्राम्हणगाव ता. कोपरगाव) यांनी त्यांची मोटार सायकल चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्या अनुशंगाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयाचा तपास सुरू असताना शहर पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, कोपरगाव येथून चोरीस गेलेले वाहने ही सिन्नर जि.नाशिक या भागामध्ये विकले आहे. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे तपासपथक यांनी सिन्नर येथे जाऊन संशयीत आरोपी व वाहनांचा शोध घेतला असता संशयीत गणेश जेजुरकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याचे दोन साथीदार दिनेश राजेंद्र आहेर अजित कैलास जेजुरकर यांच्या मदतीने मोटार सायकल चोरल्याचे सांगितल्याने दोन संशयीतांना तात्काळ ताब्यात घेतले. तिन्ही आरोपीकडे मोटार सायकल चोरीच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी पाच मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली.

आरोपींनी चोरलेल्या मोटार सायकली शिरपुर जि.धुळे येथे विकल्याचे माहीती दिल्याने प्रविण सुका कोळी प्रमोद झुंबरलाल कोळी हर्षल राजेंद्र राजपुत यांना ताब्यात घेत त्यांनी विकत घेतलेल्या मोटार सायकल गुन्हयाच्या तपासात जप्त केल्या आहेत. या गुन्हयाच्या तपासामध्ये एकुण सहा आरोपी अटक केले असून त्यांच्याकडून चोरलेल्या पाच मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटार सायकलपैकी दोन मोटार सायकली आरोपींनी कोपरगाव शहर पोलीस ठाणे हददीतून दोन मोटार सायकली कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाणे व एक मोटार सायकल येवला ग्रामीण पोलीस ठाणे हददीतून चोरली आहे. आरोपी पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असुन गुन्हयाचा तपास सुरू आहे. आरोपींकडून मोटार सायकल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पो.स. ई. रोहीदास ठोंबरे, पो.स.ई भरत दाते, पोहेकॉ डी.आर.तिकोने, पो.ना. ए.एम. दारकुंडे, पोना महेश गोडसे, पोकों जालिंदर तमनर, पोकों संभाजी शिंदे, पोकों ज्ञानेश्वर भांगरे, पोकों विलास मासाळ, पोकों एम.आर.फड, पोकों बाळु घोंगडे, पोकों राम खारतोडे, पोकों जि.व्ही. काकडे यांनी केली आहे.