उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

इर्शाळवाडी दुर्घटनेमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार आज राज्यभरात शिवसैनिकांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून शिवसेनेचा समाजसेवेचा वसा जपला.

‘इर्शाळवाडी दुर्घटना मन विषण्ण करणारी आहे. अशा दुःखदप्रसंगी मी वाढदिवस साजरा करणार नाही, मात्र कुणी सामाजिक उपक्रम राबवणार असतील तर ते त्यांनी जरूर राबवावेत,’ असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. या आवाहनानुसार शिवसैनिकांनी राज्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले.

मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यात ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, मोफत शस्त्रक्रिया, मोफत नेत्र चिकित्सा शिबीर, मोफत चष्मा वाटप, रुग्णांना फळे आणि ब्लँकेट वाटप, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप, शालोपयोगी वस्तूंचे वाटप, शिष्यवृत्ती, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, वृक्षारोपण, क्रीडा साहित्य वाटप, अंगणवाडी सेविकांना आर्थिक मदत, व्हीलचेअर वाटप असे उपक्रम राबवण्यात आले.

राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर अगदी जम्मू-कश्मीरपर्यंत शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले. या उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीने गरजवंतांना मदतीचा हात देण्यात आला व समाजसेवेचा वसा जपण्यात आला.