सोलापुरात मराठा आंदोलकांचा गनिमी कावा, टायर्स पेटवून सोलापूर-पुणे महामार्ग रोखला

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज ‘गनिमी कावा’ पद्धतीने आंदोलन केले. सोलापूर-पुणे महामार्गावर टायर्स पेटवून ‘रास्ता रोको’ करीत जालन्यातील गोळीबार, लाठीचार्ज घटनेचा निषेध करीत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे दुपारी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनामुळे पोलीसही चक्रावून गेले.

सोलापूर शहर व परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून जालना जिल्ह्यात मराठा समाजबांधवांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे तीक्र पडसाद उमटत आहेत. आज ‘गनिमी कावा’ करीत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ करीत टायर्स पेटवून दिल्याने वाहतूक ठप्प झाली होती. कार्यकर्ते रस्त्यावर बसून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत होते. सुमारे दोन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सोलापूर-बार्शी मार्गावर ‘रास्ता रोको’

दरम्यान, सोलापूर-बार्शी रोडवरही गुळवंची गावाजवळ ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मराठा समाजबांधवांनी ‘गनिमी कावा’ पद्धतीने आंदोलन सुरू केल्याने पोलीस विभागही चक्रावून गेला आहे. राम जाधव, सोमनाथ राऊत यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.