ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार कसा झाला? ससून ड्रग्ज रॅकेटच्या चौकशीसाठी समिती

ड्रग्ज माफिया ललित पाटील पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार होऊन आठ दिवस उलटून गेले तरी त्याचा शोध लागलेला नाही. ललित फरार होण्यामागे मंत्री दादा भुसे यांचा हात असल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेनेकडून करण्यात आला असल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून ससूनमधील ड्रग्ज प्रकरणी राज्य सरकारने आज चौकशीची घोषणा केली. त्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत गोडबोले, सर जे.जे. रुग्णालयाच्या ऑर्थोपेडीक विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांचा समितीत समावेश आहे. या समितीने चौकशी करून आपला अहवाल पंधरा दिवसांत शासनास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अंतरिम अहवाल तातडीने सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

भूषण पाटीलला पुण्यात आणले

ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे या दोघांना आज शिवाजी नगर न्यायालयात हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे दोघे देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते. पुणे पोलिसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. काल रात्री उशिरा दोघांनाही विमानाने पुण्यात आणण्यात आले.

ललित पाटील ड्रग्ज डील करायचा…

भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे हे दोघे ललित पाटीलसोबत ड्रग्ज रॅकेट चालवत होते. त्यात भूषण पाटील हा ड्रग्ज तयार करण्यात माहीर होता. त्याने मेफेड्रोन ड्रग्ज तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले होते. हेच मेफेड्रोन अभिषेक बलकवडे हा देशभर आणि देशाबाहेरही विकायचा. हे डील ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयात बसून करत होता, असे समोर आले आहे.

फडणवीसांना घाम फोडणार

देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणावर अजून एकही प्रतिक्रिया आलेली नाही. फडणवीसांनी राजकारण कमी करावे आणि याकडे जास्त लक्ष द्यावे, असे सुनावतानाच मी त्यांना घाम पह्डणार आहे, असा इशारा धंगेकर यांनी दिला.

महिला कोण पुरवत होता…

ललित पाटील याला महिला पुरवल्या जात होत्या. तो व्हिडीओ मी समोर आणणार आहे. हॉटेलवर तो कोणाला भेटायला जायचा हे सर्व त्या व्हिडीओत आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. धंगेकर यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यासह उपचार करणाऱया सर्व डॉक्टरांना सहआरोपी करण्याची मागणी केली. या प्रकरणात पोलीस आणि डॉक्टरांची भूमिका संशयास्पद आहे. त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हॉटेलचे धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आले समोर

ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यानंतर हॉटेल लेमन ट्री येथे गेल्याचे उघड करणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 7 वाजून 47 मिनिटांनी ते तिथे पोहचला. त्यानंतर अवघ्या तासाभरातच पोलीस कर्मचारी काळे त्या हॉटेलमध्ये गेल्याचेही दिसत आहे. गंभीर बाब म्हणजे ज्या पोलिसाच्या हाताला झटका देऊन ललित पळाल्याचे सांगितले गेले तोच हा पोलीस आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही या सीसीटीव्ही फुटेजवर बोट ठेवत निशाणा साधला आहे. एखादा पैदी रुग्ण म्हणून रुग्णालयात दाखल होतो. तिथून पसार होतो आणि शांतपणे रस्त्याने चालत जातो, बिनधास्तपणे हॉटेलच्या परिसरात वावरतो याचा अर्थ काय, अशी विचारणा त्यांनी केली.

ललितला फरार कुणी केले, योग्य वेळी जाहीर करेन

ललित पाटील याला ससूनमधून फरार व्हायला कुणी मदत केली, त्याला सोडवण्याचा कोण प्रयत्न करतंय, याची सर्व माहिती आमच्याकडे असून ती योग्य वेळी जाहीर करू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिला. ड्रग्ज तस्करीला राज्यकर्त्यांचाच आशीर्वाद असल्याचे ते म्हणाले.